मुंबई मेट्रो घाटकोपर-वसरेवा प्रकल्पास १६० कोटी रुपये देताना तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री कमलनाथ यांनी हा प्रकल्प ‘ट्रामवे’ऐवजी मेट्रोमध्ये पराविर्तित करण्याची अट ठेवली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कमलनाथ यांच्या दबावाला बळी पडले. हा प्रकल्प ट्रामवे ऐवजी मेट्रोत परावर्तित झाल्याने नियमानूसार तिकिटाचे दर ठरवण्याचा अधिकार संबधित उद्योगसमूहाला मिळाला. परिणामी ९ ते १३ रूपयांऐवजी सामान्य व्यक्तीला तिकिटासाठी १० ते ४० जादा मोजावे लागत आहेत. महागडय़ा मेट्रो तिकिटासाठी कमलनाथ व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला.
मुंबई मेट्रो घाटकोपर-वसरेवा प्रकल्पासंबंधी सोमय्या यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती समोर आली आहे. खा. सोमय्या म्हणाले की, दि. १३ फेब्रुवारी २०१२ रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना पत्र लिहिले होते. मुबंई मेट्रो ट्रामवे नव्हे तर मेट्रो प्रकल्प असल्याचे राज्य सरकारने मान्य केल्यानंतरच १६० कोटी रूपयांचा निधी दिला जाईल, अशी अट कमलनाथ यांनी घातली होती. ट्रामवे व मेट्रो तांत्रिकदृष्टय़ा भिन्न आहेत. मुंंबई मेट्रोला मान्यता देताना ९, ११ व १३ रूपये प्रवासभाडे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी ट्रामवे प्रकल्पाचा आधार घेण्यात आला. परंतु कमलनाथ यांनी राज्य सरकारवर दबाव टाकून ट्रामवे एवजी हा प्रकल्प मेट्रोमध्ये परावर्तित केला. त्यामुळे ,संबधित कंपनीने प्रवासभाडे १०, २०, ३० व ४० रूपये असे निश्चित केले. केवळ कमलनाथ यांच्या दबावामुळे मुंबईकरांना मेट्रोचा महाग प्रवास करावा लागत असल्याचे सोमय्या म्हणाले.
मेट्रोला निधी देताना कमलनाथ यांचा दबाव
मुंबई मेट्रो घाटकोपर-वसरेवा प्रकल्पास १६० कोटी रुपये देताना तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री कमलनाथ यांनी हा प्रकल्प ‘ट्रामवे’ऐवजी मेट्रोमध्ये पराविर्तित करण्याची अट ठेवली होती.
First published on: 02-08-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal nath pressured giving fund to metro