नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ‘रोड शोद्वारे’ शक्तिप्रदर्शन केले. मोठय़ा फरकाने विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून केजरीवाल यांनी रोड शोची सुरुवात केली. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाच्या गेटच्या प्रवेशद्वारावर केजरीवाल यांच्यासह आपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमा झाले होते. ही ऐतिहासिक निवडणूक असून, येथील जनतेनेच आता भ्रष्ट आणि स्वच्छ राजकारण यातून निवड करायची आहे. जनतेला आपल्याला पाठिंबा मिळेल याची खात्री असल्याचे केजरीवाल म्हणाले.
गंगा आरतीच्या नावाखाली मोदींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे राजकारण हवाई असते. सभेपूर्वी काही तास ते हेलिकॉप्टरने येतात. निवडणूक झाल्यावरही ते लगेच जातील, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. मोदींचा दारुण पराभव अटळ आहे, असे भाकीतही वर्तवले. भाजप विजयासाठी जातीय राजकारण खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अल्पसंख्याकबहुल भागावर केजरीवाल यांनी प्रचारात लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी शनिवारी शहरात येणार आहेत.
वाराणसीत विशेष निरीक्षकाची नियुक्ती
तामिळनाडू केडरमधील ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण कुमार यांची वाराणसीतील विशेष निरीक्षक म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. कुमार यांना शक्य तितक्या तातडीने वाराणसीत जाण्यास तसेच निवडणूक होईपर्यंत तेथेच थांबण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती येथील मुख्य निवडणूक अधिकारी उमेश सिन्हा यांनी दिली.