‘गॉड्स ओन कन्ट्री’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या केरळचे वैशिष्टय़ म्हणजे तेथील १०० टक्के साक्षरता. यामुळे तेथे किमान ७५ टक्के मतदान होते. लहानसहान घटक पक्ष असूनही तेथे मुख्य लढत होते ती काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंट यांच्यातच. १४ जिल्ह्य़ांच्या या राज्यात १० एप्रिलला मतदान होत असून सत्ताधाऱ्यांचे गलबत किनाऱ्याला लागेल असे वारे आहेत.
निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांच्या प्रतिकूल दाव्यांमुळे काँग्रेसची झोप उडाली असताना केरळमध्ये मात्र त्यांच्यासाठी आश्वासक वातावरण आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत डाव्या आघाडीला येथे केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले, डाव्यांच्या बालेकिल्ल्याला मोठे िखडार पाडल्याने काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटमध्ये आनंदाला भरते आले होते, मात्र, २०११ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीने १४० पकी ७३ जागा जिंकल्या, म्हणजे जेमतेम निसटते बहुमत मिळवले. काठावर उत्तीर्ण झालेल्या मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक म्हणजे सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. १४ खासदार आणि विधानसभेतील सत्ता यामुळे ते विरोधकांपेक्षा चार पावले पुढेच आहेत. डाव्या आघाडीने उमेदवार निवडीत केलेल्या गोंधळामुळे काँग्रेस आघाडी प्रचारात पुढे आहेच, शिवाय चंडी यांनी सवंग घोषणांचा सपाटाही लावला आहे. दुसरीकडे, केंद्रीय पर्यावरण मंत्रायलाने पश्चिम घाटासंबंधीची अधिसूचना नव्याने जारी करताना केरळमधील तीन हजार चौरस किमी.हून अधिक परिसराला संवेदनाक्षम परिसरातून नुकतीच सूट दिली आहे. यामुळे बेकायदा खाणमालकांना मोठा दिलासा मिळाला असून, निवडणुकीत ते चंडी यांचे हात बळकट करतील, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला १२ ते १८ जागा मिळतील, असा अंदाज विविध जनमत चाचण्यांनी वर्तवला आहे. वातावरणही तसेच आहे. एकंदरीत, काँग्रेससाठी केरळची किनारपट्टी अद्याप सुरक्षित आहे.
भाजपचा टक्का वाढणार
साम्यवाद्यांचा मोठा प्रभाव असणाऱ्या या राज्यात भारतीय जनता पक्षाला अद्याप लोकसभाच नव्हे, तर विधानसभेची एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपची येथील टक्केवारी सात टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. मात्र यावेळी ही परिस्थिती बदलेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन करतात. ते म्हणतात, ‘देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असून केरळही त्यास अपवाद नाही. अमृतानंदमयी माता यांचा मठ तसेच शिवगिरी मठ येथे आलेल्या मोदींचे जोरदार स्वागत झाले होते. एवढेच नाही तर डाव्या पक्षांशी बांधीलकी असणाऱ्या केरळा पुलाया महासभा या दलितांच्या प्रभावी गटाने त्यांच्या कार्यक्रमासाठी मोदींना आमंत्रित केले होते. याचा आम्हाला निवडणुकीत नक्कीच लाभ होईल’. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने ९७० जागा जिंकल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘चमत्कार’ होण्याची भाजपला आशा आहे.
केरळमधील थिरुअनंतपुरम मतदारसंघाकडे सर्वाचे लक्ष आहे. केंद्रीय राज्यमंत्री शशी थरुर या मतदारसंघाचे सध्याचे खासदार आहेत. भाजपचे येथील सर्वात ज्येष्ठ नेते, वाजपेयी मंत्रिमंडळातील मंत्री, ८४ वर्षीय ओ. राजागोपाल यांचे कडवे आव्हान थरुर यांच्यासमोर आहे, तर डाव्या आघाडीने चर्चच्या धर्मगुरूंमध्ये ऊठबस असणाऱ्या बेनेट अब्राहम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुरू केलेल्या चांगल्या योजनांमुळे थरुर यांचे पारडे जड आहे. दुसरीकडे, ‘भाजपचा केरळमधील पहिला खासदार’ या दृष्टीने राजागोपाल यांच्याकडे पाहिले जात आहे. राजागोपाल यांनी २००४मध्ये येथून निवडणूक लढवली असता त्यांना ३० टक्के मते मिळाली होती. सध्याच्या ‘मोदीलाटे’मुळे या टक्केवारीत भर पडल्यास नवल नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा