ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी केलेला सुमारे २८ लाख रुपयांचा खर्च लपल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
या दोन्ही उमेदवारांनी मतदारांची माहिती असलेल्या चिठ्ठय़ा (व्होटर स्लीप) वाटण्यासाठी प्रचंड खर्च केल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला.  या दोघांनी प्लॅस्टिक लॅमिनेटेड व्होटर स्लीप्स वाटल्या  या व्होटर स्लीप्सचे वाटप बेकायदा असून त्यांचा खर्च या उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चात जोडण्यात यावा, अशी तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांच्याकडून नोटीस मिळाल्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी स्लीप्स वाटण्याचे समर्थन केले. याव्यतिरिक्त सोमय्या यांनी स्वत:ची आठ होर्डिग्ज उभारून लाखो रुपयांचा खर्च केल्याचीही तक्रार आपण केली असून, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही, अशीही माहिती मेधा पाटकर यांनी दिली.
४ लाख ७६ हजार कार्ड्सकरिता ४ लाख रुपये खर्च केल्याचा सोमय्या यांचा, तर २ लाख कार्ड्ससाठी १ लाख ५ हजार रुपये खर्च केल्याचा पाटील यांचा दावा होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याची पडताळणी करून दोघांचेही दावे खोटे ठरवले. सोमय्या यांना २० लाख २६ हजार रुपये, तर पाटील यांना ८ लाख १० हजार रुपये निवडणूक खर्चात जोडण्याचा आदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा