मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रीय जनता दलातील १३ फुटीर आमदारांपैकी नऊ आमदारांनी मंगळवारी घूमजाव करत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी या नऊ आमदारांना घेऊन विधानसभा प्रांगणात ‘परेड’ केली व आपला पक्ष फुटला नसल्याचे पत्र विधिमंडळ सचिवांना दिले.
भाजपने पाठिंबा काढून घेतल्यापासून अल्पमतात गेलेल्या नितीशकुमार सरकारला पाठिंबा देत राष्ट्रीय जनता दलातील १३ आमदार फुटून बाहेर पडले होते. सोमवारी घडलेल्या या फुटनाटय़ामुळे बिहारसह देशभरात राजकीय भूकंप झाला होता. पक्षाध्यक्ष लालूप्रसाद यांनी तातडीने आमदारांची झाडाझडती सुरू केली. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सकाळी १३ पैकी नऊ आमदारांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. माजी मुख्यमंत्री व लालू यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्या घरी झालेल्या बैठकीत या नऊ आमदारांनी पुन्हा एकदा लालूंच्याच नेतृत्वावर विश्वास दाखवला. त्यानंतर लालू स्वत: या सर्व आमदारांना घेऊन विधानसभेत गेले. तेथे त्यांनी विधिमंडळ सचिव फूल झा यांच्यापुढे नऊ आमदारांची ‘ओळख परेड’ केली व राष्ट्रीय जनता दलात फूट पडली नसल्याचे स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांवर आरोप
१३ आमदारांच्या स्वतंत्र गटाला तातडीने मान्यता देण्याच्या विधानसभा अध्यक्ष उदयनारायण चौधरी यांच्यावर लालूंनी जोरदार आगपाखड केली. आपल्या सरकारच्या काळात हेच चौधरी कारागृहमंत्री होते. मात्र, आता सत्तापालट झाल्यानंतर ते नितीशकुमारांच्या वळचणीला जाऊन बसले. नितीश यांच्या प्रभावाखाली येऊनच त्यांनी फुटीर आमदारांच्या स्वतंत्र गटाला तडकाफडकी मान्यता दिली, असा आरोप लालू यांनी केला. लालूसमर्थकांनी चौधरी यांच्या घरावर दगडफेकही केली.

भाजपने पाठिंबा काढून घेतल्यापासून नितीशकुमार अस्वस्थ झाले आहेत. सरकार पडेल या भीतीने त्यांना ग्रासले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय जनता दलाला भगदाड पाडण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. आमदारांना फोडण्यासाठी ते गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नरत होते. मात्र, माझा पक्ष मजबूत आहे. त्यांचे इरादे कधीच सफल होणार नाहीत.
– लालूप्रसाद यादव, राजद अध्यक्ष

सरकार पडण्याची भीती मला नाही. ज्यांना संयुक्त जनता दलात (जेडीयू) यायचे आहे त्यांचे आम्ही स्वागतच करतो. लालूंच्या पक्षातील आमदारांनाच आमच्याकडे यायचे होते. त्यांच्याच पक्षात प्रचंड असंतोष आहे. राजद फुटण्याच्या उंबरठय़ावरच आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारांना आम्ही फोडले नाही, ते स्वत:हूनच आले. आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही.
– नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार