विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेने आपला एक उमेदवार मागे घ्यावा, यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले, तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी राहुल नार्वेकर यांचा अर्ज मागे घेतला जाईल. मात्र निवडणूक झाल्यास शिवसेनेचा किंवा भाजपचा एक उमेदवार धोक्यात येण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी १० अर्ज आल्याने निवडणुकीत चुरस आहे. मतांसाठी ‘घोडेबाजार’ होऊ नये, यासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेने दोन उमेदवार उभे करण्याचा हट्ट सोडावा, नाही तर भाजपचा उमेदवारही धोक्यात येऊ शकतो, असे भाजपकडून शिवसेना नेतृत्वाला स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपने आपल्या दोन्ही उमेदवारांना मतांचा समान कोटा म्हणजे पांडुरंग फुंडकर यांना २४ तर विनोद तावडे यांना २३ मते देण्याचे ठरविले आहे. विजयी होण्यासाठी किमान २९ मते मिळविणे आवश्यक असून तावडे हे मनसे किंवा अन्य पक्षांकडून अतिरिक्त मते मिळवितील. पण फुंडकर अडचणीत येतील, अशी शक्यता आहे.
राहुल नार्वेकर यांचे ‘बळ’ लक्षात घेता त्यांनी अतिरिक्त मते संपादन करण्यात यश मिळविल्यास भाजप उमेदवार धोक्यात येईल किंवा मनसेची मते भाजपकडे वळल्यास शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव होईल, अशी चिन्हे आहेत.

Story img Loader