द्रमुकमधून निलंबित करण्यात आलेले नेते एम. के. अळगिरी यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा पक्षप्रमुख एम. के. करुणानिधी यांनी दिला आहे.
एम. के. अळगिरी यांनी भविष्यातील राजकीय दिशा ठरविण्यासाठी दोन दिवसांपूर्वी एक बैठक आयोजित केली होती. त्यानंतर करुणानिधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा इशारा दिला आहे. अळगिरी यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली, त्यामुळेही द्रमुकमध्ये खळबळ माजली होती.अळगिरी हे द्रमुकच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे पक्षाचे सरचिटणीस के. अंबाझगन यांनी प्रसृत केले आहे. पक्षात कोणत्याही प्रकारची बेशिस्त सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.लोकसभेच्या निवडणुकीत आपली भूमिका महत्त्वाची असेल आणि द्रमुकचे भवितव्य टांगणीला लागले आहे, असे वक्तव्य करणाऱ्या अळगिरी यांनाही हा इशारा देण्यात आला आहे.
पक्षविरोधी कृती केलेली नाही
मदुराई : आपण कधीही, कोणत्याही वेळी पक्षविरोधी कृती केलेली नाही, असे असतानाही आपल्याला पक्षातून निलंबित का करण्यात आले तेच कळत नाही, असे द्रमुकतून निलंबित करण्यात आलेले नेते एम. के. अळगिरी यांनी म्हटले आहे.