गुजरात दंगलीचा निषेध करीत २००२ साली भाजपपासून दुरावलेले आणि नुकतेच पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झालेल्या लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी बिहारमधील हाजीपूरमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आह़े  तसेच त्यांचे पुत्र चिराग यांना जमुईतून आणि बंधू रामचंदर यांना समस्तीपूरमधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आह़े
भाजपशी युती केल्यानंतर लोकजनशक्ती पक्ष बिहारमधून सात जागा लढविणार आह़े  या जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा शनिवारी करण्यात आली़  हाजीपूर हा पासवान यांचा गड असून येथून ते अनेक वेळा निवडून आले आहेत; मात्र २००९ च्या निवडणुकीत त्यांना जदयूच्या रामसुंदर दास यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता़
पासवान यांचे निकटवर्तीय रामा किशोर वैशाली येथून उभे राहत आहेत़  त्यांच्याविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद आह़े  सुरज भानसिंग गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्यात दोषी ठरल्याने त्यांच्या पत्नी बीणा देवी यांना मुंगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सत्यानंद शर्मा नालंदातून लढणार आहेत़  खगारिया मतदारसंघासाठी पक्षाचा उमेदवार लवकरच घोषित करण्यात येणार आहे, असे चिराग यांनी सांगितल़े