मावळ लोकसभेच्या रिंगणात १९ उमेदवार असले, तरी महायुतीचे श्रीरंग बारणे व शेकाप-मनसेच्या पािठब्यावर लढणारे आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन थेट उमेदवारी मिळालेले राहुल नार्वेकर यांच्यात होणाऱ्या या सामन्याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. राष्ट्रीय मुद्दय़ांपेक्षा मावळात स्थानिक विषयांवर भर असून उमेदवारांचे वैयक्तिक संबंध व नात्यागोत्याच्या राजकारणाचा अधिक प्रभाव आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर फडकवलेला ‘भगवा’ कायम राखण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असून गेल्या वेळी झालेल्या पराभवाची परतफेड करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनसुबे आहेत.
पुणे जिल्ह्य़ातील चिंचवड, िपपरी, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, उरण, कर्जत विधानसभा क्षेत्र मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन बाबर गेल्या वेळी निवडून आले, त्याचा पवारांना चांगलाच धक्का बसला होता. नार्वेकर वगळता अन्य उमेदवार िपपरी-चिंचवडचे असून या ठिकाणी साडेआठ लाखांहून अधिक मतदार आहे. नार्वेकर यांच्यासाठी खुद्द अजित पवार यांनीच कंबर कसली असली, तरी शहरातील मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यताच अधिक प्रमाणात आहे. मात्र, मावळ व घाटाखालच्या भागातील मते निर्णायक ठरतील, असे स्पष्ट चित्र आहे. अनधिकृत बांधकामे, मावळ गोळीबार, राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी, िपपरी पालिकेतील भ्रष्टाचार आदी स्थानिक मुद्दे प्रामुख्याने प्रचारात असून नरेंद्र मोदी यांचा प्रभावही दिसतो आहे.
निवडणुका जाहीर झाल्यापासून मावळात बरीच उलथापालथ झाली आहे. गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये गेले. बाबरांना उमेदवारी नाकारून शिवसेनेने श्रीरंग बारणेंना संधी दिली. पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करत बाबरांनी मनसेचा रस्ता धरला. शिवसेना व शेकापची युती तुटली. राष्ट्रवादीशी कथित काडीमोड घेतलेल्या लक्ष्मण जगतापांना शेकापने उमेदवारी दिली, त्यांना राज ठाकरे यांनी पुरस्कृत केले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नार्वेकरांऐवजी जगतापांचे काम करतात म्हणून अजितदादांनी अनेकांना दमात घेतले. प्रारंभी काँग्रेसने असहकार पुकारला व अजितदादांच्या सांगण्यावरून मागेही घेतला. अशा नाटय़मय घडामोडींमुळे मावळात नुसता ‘संशयकल्लोळ’ आहे. नार्वेकरांची मदार अजितदादा व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर आहे. चळवळीतील आपचे मारूती भापकर यांना मानणारा स्वतंत्र वर्ग आहे. तथापि, बारणे यांचे कडवे आव्हान जगताप तसेच नार्वेकर यांच्यासमोर आहे.
स्थानिक मुद्दे व नात्यागोत्याचे राजकारण
मावळ लोकसभेच्या रिंगणात १९ उमेदवार असले, तरी महायुतीचे श्रीरंग बारणे व शेकाप-मनसेच्या पािठब्यावर लढणारे आमदार लक्ष्मण जगताप
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2014 at 03:40 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local issues and politics of relationship