चहाच्या पेल्याचे राजकारण हे लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे आगळेपण ठरणार आहे. लहानपणी कधी चहा विकणारे नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यावर काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी केलेली बोचरी थट्टा आता या चहाच्या पेल्यातील वादळाप्रमाणे उसळली आहे. अय्यर यांनी मोदींवर टीका केली आणि चहा हे जणू भाजपचे राष्ट्रीय पेय झाले. चहा हे ‘व्यसन’ मानणाऱ्या संघ परिवारातील चर्चादेखील चहाशिवाय पुढे सरकेनाशा झाल्या, अशीही चर्चा आहे..
भाजपने तर आता देशभरात ‘चाय पे चर्चा’ अशी चळवळच उघडली, आणि ‘मोदी चहा स्टॉल’ही जागोजागी उभे राहिले. आता यापुढेही एक मजल मारण्याची तयारी मोदी समर्थकांच्या एका गटाने सुरू केली आहे, अशी चर्चा आहे. मोदी यांच्या नावाने होणाऱ्या ‘चाय पे चर्चा’ उपक्रमासाठी ‘नमो टी पार्टी’ या नावाने ‘ट्रेडमार्क’ नोंदणी करण्यासाठी या गटाने सरकारकडे अर्जदेखील केला आहे. ‘नमो टी पार्टी’ ही एक ‘राष्ट्रीय चळवळ’ व्हावी, यासाठी अहमदाबादमधील शैलेश तिवारी नावाच्या एका मोदी समर्थकाने मोहीम उघडली असून, त्याच्या निमंत्रकपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. चाय पे चर्चा या कार्यक्रमाची दुसऱ्या कोणासही नक्कल करता येऊ नये, म्हणून ही शक्कल लढविण्यात आल्याचे तिवारी म्हणतात. एकाच व्यवसायातील अनेकांनी एकत्र येऊन चहाचे घुटके घेत एखाद्या विषयावर चर्चा करावी आणि विधायक विचारमंथन करावे हा या चळवळीचा उद्देश राहील, असे सांगण्यात येते. देशभरातून हजारो कार्यकर्ते या चळवळीशी जोडले जातील, असा तिवारींचा विश्वास आहे. चहाला राजकारणाची अशी मान्यता मिळाल्यावर, ‘बसू आणि बोलू’ असे ‘धोरण’ असलेल्या अनेकांच्या सवयी बदलून जातील, अशीही एक छुपी चर्चा सध्या सुरू आहे.
असे होणार असेल, तर ‘इस चाय पे’ चर्चा होणारच..
नक्कल आणि शक्कल..
चहाच्या पेल्याचे राजकारण हे लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे आगळेपण ठरणार आहे. लहानपणी कधी चहा विकणारे नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यावर काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी केलेली बोचरी थट्टा आता या चहाच्या पेल्यातील वादळाप्रमाणे उसळली आहे.
![नक्कल आणि शक्कल..](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/03/lok0111.jpg?w=1024)
First published on: 03-03-2014 at 03:00 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha 2014 narendra modi as a humble chaiwala seeking pm chair