कायदा आणि सुव्यवस्था तसेच विकासाच्या मुद्दय़ावर ममता बॅनर्जी सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या डाव्या पक्षांच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची झुंज आहे. काँग्रेसला आपली ताकद दाखवून द्यायची आहे तर भाजपला मोदींच्या करिष्म्याची आशा आहे. अशा स्थितीत पश्चिम बंगालमधील सामना रंगत जाणार आहे. निकालानंतरची सत्तासमीकरणाच्या दृष्टीने ममता बॅनर्जीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दिल्लीतील सत्तेची सूत्रे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच ठरवतील, असा प्रचार त्यांच्या समर्थकांकडून सुरू आहे. राज्यातील डाव्यांची सत्ता घालवल्यानंतर परिबोर्तनाचा नारा देत ममता दीदींनी राज्यावर आपली पकड घट्ट केली आहे. राज्यात कारभाराचा अनुभव असल्याने केंद्रात जाऊ शकतो, असे सांगत ममतांनी आपली पंतप्रधानपदाची महत्तकांक्षा लपवून ठेवलेली नाही. लोकसभेच्या जागांच्या बाबतीत उत्तर प्रदेश (८० जागा), महाराष्ट्र (४८ जागा) त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ४२ जागा आहेत. यावेळी किमान ३० जागा जिंकून भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांनंतर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची महत्त्वाकांक्षा ममता बाळगून आहेत. राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मतदारांनी तृणमूलला साथ दिल्याने ममतांचा आत्मविश्वास वाढला आहे. गेल्यावेळी ३१ टक्के मते मिळवून तृणमूलने १९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी लोकसभेच्या मैदानात नवे चेहरे उतरवत तृणमूलने प्रस्थापित पक्षांना धक्का दिला आहे. फुटबॉलपटू बायचंग भुतिया, लोकप्रिय कलावंत देव, मुनमुन सेन, शताब्दी रॉय अशा बिगर राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी संधी दिली आहे. एकाच वेळी भाजप, काँग्रेस आणि तिसरी आघाडी यापासून अंतर ठेवत ममतांची वाटचाल सुरू आहे. ममता ऐनवेळी काय करतील याचा काहीच भरवसा नाही. राज्यात मोठय़ा प्रमाणात मुस्लिम मतदार  असल्याने भाजपशी आघाडी करणे त्यांना परवडणार नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ममतांना पाठिंबा दिल्याने त्यांची एक देशव्यापी प्रतिमा तयार झाली आहे. त्याचा फायदा उठवण्याचा तृणमूलचा प्रयत्न आहे.
डाव्यांकडून नवे चेहरे
डाव्या पक्षांची राज्यात मजबूत संघटना आहे. त्यांची मतेही ४० टक्क्यांच्या आसपास राहिलेली आहेत. प्रतिमा सुधारण्यासाठी यावेळी २६ नवे चेहरे उतरवत डाव्या पक्षांनी ममतांना रोखण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. डाव्यांच्या तीन दशकांच्या राजवटीत कारखाने बंद पडले, कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असा तृणमूलचा प्रचार अजूनही प्रभावी ठरतोय अशी चिन्हे आहेत. त्यामुळे डाव्या पक्षांपुढे पूर्वीच्या १५ जागा टिकवण्याचे आव्हान आहे.
डाव्यांच्या पहिल्या यादीत १२ मुस्लिम उमेदवार आहेत. २५ वर्षीय विद्यार्थी नेता शेख इब्राहिम अली याला उमेदवारी देत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न  मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. माकप ३२ जागा लढवणार असून १० जागा भाकप, फॉरवर्ड ब्लॉक आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष हे डाव्या आघाडीतील घटक लढवणार आहेत. काँग्रेस आणि भाजपला बंगालमध्ये चांगल्या कामगिरीचे आव्हान आहे. गेल्यावेळच्या सहा जागा राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. भाजपने कोलकत्यात मोदींची सभा आयोजित करून शक्तिप्रदर्शन केले, मात्र प्रत्यक्षात मतांमध्ये त्याचा कितपत फायदा होईल याबाबत शंका आहे. एकूणच काय पश्चिम बंगालमध्ये जरी चौरंगी लढत असली, तरी प्रत्यक्षात पुन्हा डाव्यांशी दोन हात करून ममता अधिकाधिक जागा जिंकून दिल्लीच्या सत्ताकारणात आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायचा त्यांचा प्रयत्न राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रंगतदार लढती
बांकुरा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसतर्फे प्रख्यात अभिनेत्री मुनमुन सेन, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू सुगता बोस जाडवपूरमधून रिंगणात हुगळी मतदारसंघातून विख्यात पत्रकार आणि भाजपचे राज्यसभा सदस्य चंदन मित्रा यांना उमेदवारी कोलकाता उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे जुने कार्यकर्ते सोमेन मित्रा यांनी पक्षांतर्गत निवडणूक जिंकत उमेदवारी पटकावली.

रायगंजमध्ये काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचे बंधू सत्यरंजन तृणमूलचे उमेदवार सध्या प्रियरंजन यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री दीपा दासमुन्शी काँग्रेसकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ममतांचे भाचे आणि तृणमूलच्या युवा शाखेचे अध्यक्ष अभिषेक बंडोपाध्याय डायमंड हार्बरमधून उमेदवार.