उमेदवारी न मिळणाऱ्यांना योग्य संधी : राजनाथ
लखनऊ : लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने अनेक नेते, कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केला आहे. ‘‘निवडणुकीत ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही, म्हणजे पक्षाने त्यांची उपेक्षा केली आहे, असा त्याचा अर्थ नाही. केंद्रात भाजपची सत्ता आल्यास सर्व असंतुष्ट नेते व कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जाईल,’’ असे राजनाथ यांनी सांगितले. अन्य पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्यांना तिकीट देण्यात आले, हे योग्य आहे का, असे विचारले असता राजनाथ म्हणाले, अन्य पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची संख्या खूपच कमी आहे. उमेदवारी देताना भाजपच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील निवडणूक समितीने चर्चा करून योग्य उमेदवारालाच तिकीट दिले आहे.
‘आप’च्या भ्रष्टाचार, असमानतेच्या मुद्दय़ाचे डाव्यांकडून स्वागत
नवी दिल्ली :  आम आदमी पक्षाने उचललेल्या देशातील भ्रष्टाचार, असमानता या मुद्दय़ांचे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने बुधवारी स्वागत केले आह़े  परंतु, या परिस्थितीला कारणीभूत असलेल्या ‘नवउदारमतवादी’ धोरणांबाबत ‘आप’ने त्यांची भूमिका अधिक स्पष्टपणे मांडायला हवी, अशी अपेक्षाही माकपकडून व्यक्त करण्यात आली आह़े निधर्मी आणि डाव्या पक्षांशी युती करायची का, याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने घ्यायचा आह़े  मात्र हा निर्णय निवडणुकांनंतरच होऊ शकेल, असेही आपसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी सांगितल़े  
निलेकणींची अनंतकुमार यांच्याविरोधात तक्रार
बंगळुरू : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण बंगळुरु मतदारसंघाचे उमेदवार अनंतकुमार आधार कार्ड योजनेवर हकनाक टीका करीत असून त्यांची भूमिका विकासास खीळ घालणारी असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार आणि इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या नंदन निलेकणी यांनी केला आहे. निलेकणी यांनी अनंतकुमार यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडेही तक्रार केली आहे. एकेकाळी आधार कार्ड या कार्यक्रमाचे समर्थन करणारे भाजपचे हेच अनंतकुमार आता मात्र त्या कार्यक्रमावर सडकून टीका करीत आहेत, हे योग्य नव्हे, असा निषेधाचा सूर निलेकणी यांनी आळवला आहे. त्यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडेही या विरोधात तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा