काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना संधी नसणाऱ्या तामिळनाडूत जयललिता यांचा अण्णा द्रमुक तर करुणानिधी यांचा द्रमुक या दोन मातब्बर पक्षांतच खरी लढत होणार आहे. मात्र डाव्यांना बाजूला सारणारा अण्णा द्रमुक आणि घोटाळेबाजांना उमेदवारी देऊन आपल्या मुलाला बाहेरचा रस्ता दाखवणारा द्रमुक यांच्यापैकी कोण अधिक जागा पटकावून केंद्रात आपला ठसा उमटवणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तामिळनाडूमध्ये लोकसभेसाठी अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन राजकीय पक्षांमध्ये जोरदार टक्कर होणार आहे. पुडुचेरीसह तब्बल ४० लोकसभेच्या जागा या दक्षिणी राज्यांमध्ये असल्यामुळे तामिळनाडूकडे भाजप, काँग्रेसचे डोळे लागले आहेत. श्रीलंकेतील तामिळी नागरिकांचा मुद्दा तसेच मच्छीमार आणि इतर स्थानिक मुद्दय़ांवरच येथील राजकारण खेळले जाते. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना इथे तशी मोठी संधी नाही. गेल्या वेळी सर्वाधिक उमेदवार उभे करूनही केवळ नऊ जागा पदरात पडल्यामुळे चवताळलेल्या जयललिता यांनी श्रीलंकेतील तामिळ नागरिक आणि राज्यातील मच्छीमारांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार आणि द्रमुकवर टीकेची तोफ डागली आहे. तसेच २०११च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा सपशेल पराभव करणाऱ्या जयललिता यांनी राष्ट्रीय स्तरावरही शिरकाव करण्याच्या दृष्टीने या वेळी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व ३९ जागांवर तसेच केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीतूनही उमेदवार उभे केले आहेत. जयललिता यांनी डाव्यांशी संधान साधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यातच आता द्रमुकने काँग्रेसबरोबर जाण्याचे टाळल्यामुळे जयललिता निवडणुकीनंतर काँग्रेसशी हातमिळवणी करणार का, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
तर दुसरीकडे केंद्रात राज्यातून १८ खासदार पाठवणाऱ्या करुणानिधी यांच्या द्रमुकने काँग्रेसला विश्वासात न घेता शेवटच्या क्षणी ३९ पैकी ३५ जागांवर तसेच पुडुचेरीतूनही उमेदवार जाहीर करीत काँग्रेसला धक्का दिला आहे. पक्षाने २७ नवीन चेहरे िरगणात उतरवले आहेत. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र अळ्ळगिरी यांना पक्षाने बाजूला सारले आहे. तसेच त्यांच्या समर्थकांचेही तिकीट कापले आहे.
काँग्रेसची कोंडी
श्रीलंकन तामिळीच्या मुद्दय़ावर कोणताही द्रविडी पक्ष काँग्रेससोबत जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. २००९ मध्ये द्रमुकशी हातमिळवणी करून नऊ जागा पदरात पाडून घेतल्या. मात्र आता स्थानिक मुद्दय़ांवर केंद्र सरकार सहकार्य करीत नसल्याचे सांगत एके काळी केंद्रात सोबत असणाऱ्या द्रमुकनेही हात झटकल्यामुळे काँग्रेसला एकटय़ाने निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
नव्या आघाडीचा उदय
तामिळनाडूमध्ये भाजपने अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके तसेच एमडीएमके, पीएमके आणि इतर काही स्थानिक राजकीय पक्षांशी युती काही जागा जिंकण्याचा भाजपला विश्वास आहे.जयललितांनी आतापर्यंत भाजपवर थेट टीका करण्याचे टाळले आहे. निकालानंतर जयललिता किंवा करुणानिधी यांची भूमिका काय रहाणार हे रंजक रहाणार आहे.
रंगतदार लढती
द्रमुकने टूजी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी केंद्रीय मंत्री ए राजा यांना नीलगिरी या राखीव मतदारसंघातून उतरवले आहे. तर अण्णा द्रमुकने येथून सी गोपालकृष्णन यांना उतरवले आहे. त्याचप्रमाणे आणखी एका घोटाळ्यात आरोपी असणाऱ्या दयानिधी मारन यांना मध्य चेन्नईमधून उतरवले असून द्रमुकने एस आर विजयकुमार यांना तेथून उतरवले आहेत. याशिवाय द्रमुकने तंजावरमधून टी आर बाळू, तुतिकोरिनमधून पी जगन आदी दिग्गज मैदानात उतरल्यामुळे येथील लढती रंगतदार होतील, असे चित्र आहे .
सामींची प्रतिष्ठा पणाला
सध्या पुडुचेरीची जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे. व्ही नारायणस्वामी हे विद्यमान येथील खासदार आहेत. केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुडुचेरीच्या एका जागेसाठी आता अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यानुसार द्रमुकने एएमएच नझीम तर अण्णा द्रमुकने एम व्ही ओमलिंगम यांना उतरवले आहे.
दोन द्रविडी पक्षांमध्येच पुन्हा संग्राम
काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना संधी नसणाऱ्या तामिळनाडूत जयललिता यांचा अण्णा द्रमुक तर करुणानिधी यांचा द्रमुक या दोन मातब्बर पक्षांतच खरी लढत होणार आहे.
First published on: 12-03-2014 at 02:32 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha poll main fight between jayalalitha and karunanidhi party in karnataka