सकाळी सात-साडेसातची वेळ.. नांदेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव चिखलीकर पाटील यांच्या बंगल्यात धामधूम सुरू होती. दरवाजाबाहेरचा चपलाबुटांचा ढीग मिनिटागणिक वाढतच होता. थोडय़ाच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चिखलीकरांच्या घरी येणार होते. आतल्या एका दिवाणखान्यात, माजी खासदार गंगाधर कुंटुरकर व अन्य एक-दोन बडे स्थानिक नेते प्रतीक्षा करीत थांबले होते. चेहऱ्यावर काहीशी तणावपूर्ण शांतता. सहा-सात जण असूनही, कुणीच कुणाशी फारसं बोलत नव्हतं. मधूनच एखाद्याचा मोबाइल वाजायचा. ‘मी एअरपोर्टवर आहे, साहेब येणारेत..’ असं काही तरी सांगून तो फोन बंद केला जायचा.. शरद पवार पोहोचताच अशोक चव्हाणदेखील बंगल्यावरच येणार असून त्यांची बैठक इथेच होणार आहे, अशी कुणकुण लागल्यानं, स्थानिक पत्रकार आणि वाहिन्यांचे प्रतिनिधीही बंगल्याच्या आसपास रेंगाळत होते.. नांदेडमध्ये नरेंद्र मोदींची मोठी सभा झाल्यामुळे काँग्रेस आघाडीत पसरलेला तणावच जणू या दिवाणखान्यापर्यंत झिरपला होता. अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज उमेदवार नेता आणि नांदेडसारखा काँग्रेसचा बालेकिल्ला असतानादेखील, या दिवाणखान्यात मात्र चिंता होती. प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे परस्परांचे राजकीय वैरी.. दोघांनीही कधी काळी मैत्री जपलेली आणि नंतर तितक्याच कडवटपणानं वैरही जोपासलेलं. मोदी प्रभावामुळे, राजकारणाची गणितं बदलल्याचं भान आलं आणि चिखलीकर-चव्हाण वैर संपावं, यासाठी हालचाली सुरू झाल्या. पवार यांची नांदेड-भेट हा त्या प्रयत्नांचाच भाग असल्याचं स्थानिक मीडियावाल्यांनाही माहीत होतं. चिखलीकरांच्या बंगल्यावर चव्हाण येणार आणि पवारांच्या समक्ष दोघांत दिलजमाई होणार ही स्थानिक राजकारणातील अलीकडची सर्वात मोठी बातमी ठरणार होती. नऊच्या सुमारास शरद पवार यांचं आगमन झालं. बंगल्याबाहेर भलीमोठी फुलांची रांगोळी सजलेली होतीच.. फटाक्यांचाही दणदणाट झाला.. शरद पवार आले, त्यांचं शानदार स्वागत झालं, काही कार्यकर्त्यांनी लवून नमस्कार केले.. पवार आतील दालनात गेले, आणि गर्दी पांगू लागली. अशोक चव्हाणांची प्रतीक्षा करणारे माध्यमांचे प्रतिनिधीही  निघून गेले.. बंगल्यावर पवारांसोबत चिखलीकरांची खलबतं झाली.
..सकाळी पावणेनऊ-नऊची वेळ. नांदेडच्या शिवाजीनगर भागातील अशोक चव्हाणांच्या बंगल्यावरील गर्दी वाढू लागली होती. काही जण काही कामं घेऊन आले होते. आमच्या गावात एस्टी सुरू करा, मग सगळं मतदान अशोकरावांनाच होणार.. असा आग्रह करत कुणी तरी साहेबांच्या पीएसमोर ठाण मांडून थांबला होता. मग कुणाला तरी फोन होतो. मतदानाआधी गावात एस्टी सुरू होणार, या आनंदात तो बाहेर पडतो तोवर दुसरा कुणी तरी आलेला असतो.. अचानक बाहेरच्या टीव्हीवर कुठल्याशा मराठी वाहिनीवरच्या बातम्यांवर सर्वाचे लक्ष खिळते. पडद्यावरच्या धावत्या पट्टीत एक बातमी सरकत असते. ‘चव्हाण चिखलीकर दिलजमाई.. प्रतापराव चिखलीकर पाटील सक्रिय, अशोक चव्हाणांसाठी प्रचार करणार..’ सतत फिरणारी ती बातमी सारे जण अनेकदा वाचतात. तणाव कमी झाल्याचा भाव बहुधा साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला असतो.. पावणेदहा वाजता अशोक चव्हाण बाहेर येतात आणि गर्दीला वेग येतो.. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या झेंडय़ासोबतच एक निळा झेंडा असलेल्या गाडीत अशोक चव्हाण बसतात, मागच्या दोन-चार गाडय़ाही भरतात आणि प्रचार दौरा सुरू होतो. नांदेडहून थेट मुखेड विधानसभा मतदारसंघात आज जातीने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचं, असं नियोजन स्वत: अशोक चव्हाण यांनीच केलेलं असतं. भरगच्च कार्यक्रम झाल्यानंतरही रात्रीचा मुक्कामही मुखेडलाच ठरलेला असतो. ‘एखाद्या गावात मुक्काम करण्याची वेळ याआधी कधी आली नव्हती. आता मुक्काम करावा लागतोय, म्हणजे, या मतदारसंघावर जरा जास्त लक्ष देण्याची गरज निर्माण झालीय..’ कुणी तरी कार्यकर्ताच बोलून जातो..
शहराची हद्द संपल्यानंतर गाडी मुखेडच्या रस्त्याला लागते. अशोकरावांनी खास लक्ष घालून बीओटी तत्त्वावर बनवून घेतलेल्या एका गुळगुळीत रस्त्यावरून गाडय़ा धावत असतात. काही अंतरानंतर मात्र गाडय़ा कच्च्या रस्त्यावर वळतात.  वाटेतील लहान लहान गावांत वाटेवरच गावकऱ्यांचे घोळके जमा होऊन थांबलेले असतात. कुणी तरी एखादं निवेदनही पुढे करतो, तर कुणाला हस्तांदोलन करतानाचा फोटो काढून घ्यायचा असतो. कुणी तरी घरी यायचा आग्रह करतो आणि अशोक चव्हाणांपाठोपाठ सारी गर्दी त्या एवढय़ाशा घरात गोळा होते. समोरच्या पडवीतल्या एका खाटेवर अशोकराव बसतात, मग संवाद सुरू होतो, ‘आमची मतं शंभर टक्के तुम्हालाच मिळणार,’ असं कुणी तरी जोरदार आवाजात सांगतो. आणि बसलेल्यांपैकी कुणी तरी चमकून त्या आवाजाच्या दिशेनं पाहतो.. ‘गावात सतराअठराशे मतं हायेत, हजारबाराशे तरी तुमाला मिळणारच..’ अशी ‘दुरुस्ती’ करतो. मग अशोकराव बोलतात. पुन्हा वाटेतल्या गावात असेच.. मध्ये दोन-तीन मोठय़ा सभांचेही आयोजन करण्यात आलेले असते. मोदी, भाजपवर अपेक्षेप्रमाणे टीका होते.
आदर्श प्रकरण, भ्रष्टाचार असे शब्द आसपास कुठेही नसतात. अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात आदर्शचा मुद्दाच नाही आणि जे काही त्यातून पुढे आलंय, त्याला भ्रष्टाचार मानतच नाही.. कुणी कार्यकर्ता छातीठोकपणे सांगत असतो.. त्यामुळे साहेबांच्या निवडणुकीत या मुद्दय़ांचा अडसरच नाही. अडसर आहे, तो इथल्या स्थानिक राजकारणाचाच.. राष्ट्रवादीचे गट किती काम करतात, प्रतापरावांसारखे नेते किती जमवून घेतात, मुखेडचे राजकारण किती साथ देते, यावरच त्यांचा विजय ठरणार आहे, असंही कुणी सांगू लागतो, पण लगेचच त्याला गप्प केले जाते.  एका सभेनंतर स्थानिक नेत्याच्या घरी जेवणासाठी काही वेळ सारे जण विसावतात आणि गप्पा सुरू होतात. उमेदवारीचा निर्णय होण्यासाठी लागलेला विलंब, पक्षातीलच काही नेत्यांकडून सुरू असलेल्या विरोधाच्या बातम्या, शरद पवारांनी पाठराखण केल्यानंतरही पक्षात दिसणारे मौन असे मुद्दे घेत कुणी तरी त्यांना छेडण्याचा प्रयत्न करतो, पण ‘तो भूतकाळ आहे,’ एवढं सांगून अशोकराव गप्प होतात.. मतभेद संपले, आता मनभेदही संपतील आणि आपण विजयी होऊ असं सांगून अशोकराव जेवण संपवतात.. सकाळी चिखलीकरांच्या घरी पवारांसोबत ठरलेली भेट झाली की नाही, हा मागे उरलेला प्रश्न सोबत घेऊनच गाडय़ा पुन्हा रवाना होतात. असा दिवस संपला, की मुखेडच्या मुक्कामात, स्थानिक राजकारणाचा मुकाबला करण्याचे डावपेच सुरू होतात.. अशोकराव आणि पवारांची भेट नांदेडमध्येच एका हॉटेलात पार पडल्याचं दुसऱ्या दिवशी समजतं, आणि चिखलीकरांच्या ‘दिलजमाई’च्या बातमीचं रहस्य उलगडतं..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे परस्परांचे राजकीय वैरी.. दोघांनीही कधी काळी मैत्री जपलेली आणि नंतर तितक्याच कडवटपणानं वैरही जोपासलेलं. मोदी प्रभावामुळे, राजकारणाची गणितं बदलल्याचं भान आलं आणि चिखलीकर-चव्हाण वैर संपावं, यासाठी हालचाली सुरू झाल्या. पवार यांची नांदेड-भेट हा त्या प्रयत्नांचाच भाग होता.

प्रतापराव चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे परस्परांचे राजकीय वैरी.. दोघांनीही कधी काळी मैत्री जपलेली आणि नंतर तितक्याच कडवटपणानं वैरही जोपासलेलं. मोदी प्रभावामुळे, राजकारणाची गणितं बदलल्याचं भान आलं आणि चिखलीकर-चव्हाण वैर संपावं, यासाठी हालचाली सुरू झाल्या. पवार यांची नांदेड-भेट हा त्या प्रयत्नांचाच भाग होता.