बीड मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचे एकेकाळचे शिष्य आणि महसूल खात्याचे राज्यमंत्री सुरेश धस यांची उमेदवारी राष्ट्रवादीने सोमवारी जाहीर केली.
छगन भुजबळ यांच्यानंतर धस हे लोकसभेची उमेदवारी मिळालेले दुसरे मंत्री ठरले आहेत. बीड मतदारसंघातील उमेदवाराचे नाव निश्चित करण्याकरिता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निवडक नेत्यांबरोर चर्चा केली. सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा लढण्यास नकार दिला होता. मुंडे या इतर मागासवर्गीय नेत्याच्या विरोधात राष्ट्रवादीने मराठा उमेदवार उभा करून गतवेळप्रमाणेच ही लढाई इतर मागासवर्गीय विरुद्ध मराठा होईल, अशी व्यवस्था केली आहे. २००९ मध्ये मुंडे यांच्या विरोधात रमेश आडासकर यांना सुमारे चार लाख मते मिळाली होती.
आष्टीचे आमदार सुरेश धस हे पहिल्यांदा भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. मुंडे यांच्याशी बिनसल्यावर त्यांनी राष्ट्रवादीची वाट पकडली. सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आल्याने मुंडे यांना निवडणूक सोपी झाल्याचे भाजपच्या वर्तुळात बोलले जाते. नगरच्या वेशीवर असलेल्या आष्टीतील उमेदवार उभा केल्याने बीडशी संलग्न असलेल्या तालुक्यांमध्ये मुंडे यांना चांगला पाठिंबा मिळेल, असे मुंडे यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. लोकसभा लढवण्याच्या उद्देशानेच गेल्या जून महिन्यात धस यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा