लोकसभा निवडणुकीत गुजरात मॉडेलची चर्चा झाली, पण महाराष्ट्र गुजरातपेक्षा खूप पुढे असून, महाराष्ट्र सदैव प्रथम क्रमांकाचे राज्य राहावे यासाठी आघाडी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी ठिकठिकाणी औद्योगिक महानगरे निर्माण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. गोरगरीब व सर्वसामान्यांना विनामूल्य व उत्तम आरोग्यसुविधा देण्यात राज्य शासन आघाडीवर असल्याचा विश्वास त्यांनी केला.
कराडच्या वेणूताई चव्हाण जिल्हा उपरुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग, नेत्ररोग निवारण केंद्र तसेच वैद्यकीय सेवकांचे गृहसंकुल व रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच्या धर्मशाळेचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्ष अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, पुणे विभागाचे आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, की आज अवघ्या देशभर राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातून गोरगरीब व सर्वसामान्यांना तत्काळ आरोग्यसुविधा मिळत आहेत. केंद्र सरकारच्या योजना सक्षमपणे राबवण्यात महाराष्ट्र अग्रेसर असून, राजीव गांधी जीवनदायी योजना व अन्नसुरक्षा योजनांचा अंमल हा काँग्रेस आघाडी शासनाचा अतिशय महत्त्वाचा निर्णय ठरला असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
सातारला वैद्यकीय महाविद्यालय, ट्रामा सेंटर होणार असून, येथे ६ डायलिसिस मशिन्स सुरू असून, लवकरच कराडातही ४ मशिन्स व सिटी स्कॅन मशिन्स सुरू होईल. जिल्हय़ात आणखी ५ ग्रामीण रुग्णालये सुरू होत असून, दूरध्वनीवर टोल फ्री १०२, १०४ व १०८ क्रमांक फिरवल्यावर वैद्यकीय सेवा, रक्त व रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध होत आहे.
लोकसभा निवडणुकीत विकासाच्या गप्पा झाल्या, परंतु उत्तम व नियोजनबद्ध काम करून, महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. येथील दरडोई उत्पन्न सर्वाधिक असून, उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्र खूपच पुढे आहे. राज्यात काही अडचणी आहेत. सिंचनात महाराष्ट्र मागे आहे. पण दुष्काळी स्थितीतही टंचाईग्रस्ना पाणी देण्यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले, असे ते म्हणाले.
आदिवासींच्या आरक्षणाला धक्का  नाही
सांगली : आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. महागाई कमी झालीच नाही त्यामुळे लोकांचा महायुतीच्या नेत्यांवर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे जनता पुन्हा आघाडी शासनाच्या पाठीशी ठामपणने उभी राहील असेही ते म्हणाले.

Story img Loader