महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय मिळाल्यास ‘मुख्यमंत्री आपलाच होईल’ अशी अपेक्षा शिवसेनेने ठेवली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र, वेगळाच विचार चालवला आहे. शिवसेना जुना सहकारी असला तरी जास्तीत जास्त जागा जिंकून महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, याची काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य प्रभारी राजीव प्रताप रूडी यांना दिल्याचे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांसमवेत झालेल्या विस्तृत बैठकीत मोदींनी महाराष्ट्र व हरयाणाचा आढावा घेतला. रूडी यांनी मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेच्या भूमिकेची माहिती मोदींना दिली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत कुरबुरी सुरू आहे. त्याचे पडसाद शनिवारी पंतप्रधान मोदी व भाजप महासचिवांच्या बैठकीतदेखील उमटले. विधानसभा निवडणुकीला अवकाश असताना आत्तापासूनच शिवसेना मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगत आहे. जागावाटपाचा फाम्र्युला बदलण्याच्या भाजपच्या मागणीला खुद्द उद्धव ठाकरे यांनी केराची टोपली दाखवली. शिवाय महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य करून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत युतीला घवघवीत यश मिळाल्याने त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होईल, असा विश्वास राजीव प्रताप रूडी यांनी या बैठकीत मोदींसमोर व्यक्त केल्याचे समजते.
मुंडे-फडणवीसांचे ‘तुम्हीच, तुम्हीच..’
*‘वर नरेंद्र खाली देवेंद्र’ ही घोषणा चांगली असल्याचे सांगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. औरंगाबादमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
* फडणवीस यांनी मात्र ‘मी कोणत्याही स्पध्रेत’ नसल्याचे स्पष्ट केले.
* राज्यातील विधानसभा निवडणुका महायुतीच्या नेतृत्वाखाली होतील, असे मोघम उत्तर देत मुंडे यांनी नेतृत्वाचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.
* मात्र, ‘मुंडे यांना केंद्रात केवळ ३ महिन्यांसाठी दिले आहे. राज्यात त्यांना सव्याज परत घेऊ,’ असे सांगत फडणवीस यांनी भाजप मुंडेंच्याच नेतृत्वाखाली लढेल, असे स्पष्ट केले.
विधानसभेच्या निवडणुका कोणाच्याही नेतृत्वाखाली झाल्या तरी राज्यात महायुतीची सत्ता यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी कामाला लागलो आहे. नेतृत्व कोणाकडे या प्रश्नावरून बुद्धिभेद केला जाऊ शकतो. मात्र, त्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष देऊ नये.
गोपीनाथ मुंडे