महायुतीतील चारही घटकपक्षांना हव्या असलेल्या जागांपैकी बहुसंख्य जागा शिवसेनेकडेच असल्याने जागावाटप रेंगाळले आहे. आपल्याकडच्या कोणत्या जागा या घटकपक्षांना हव्या आहेत, याविषयी चर्चा भाजपने पूर्ण केली असून त्यापैकी कोणत्या जागा सोडता येतील, यावर विचार सुरू आहे. शिवसेनेने मात्र घटकपक्षांना फारसा प्रतिसाद न दिल्याने जागावाटप अडले आहे. शिवसेना व भाजपने घटकपक्षांना नेमक्या किती जागा सोडायच्या, याचा निर्णय घेण्याआधी त्या पक्षांमधील जागावाटपाचा निर्णय आधी घ्यावा, तरच कोंडी फुटेल, अशी काही घटकपक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे.
महायुतीतील जागावाटपासाठी भाजप व शिवसेनेत चर्चा होऊ शकलेली नाही आणि दोन्ही बाजूने खणाखणी सुरू आहे. मात्र भाजपने चारही घटकपक्षांशी बोलणी करून भाजपच्या वाटय़ाला असलेल्या जागांपैकी त्यांना कोणत्या अपेक्षित आहेत, हे जाणून घेतले आहे. स्वाभिमान पक्षाचे राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांबरोबरच विदर्भातील बाळापूर व चिखलीचीही मागणी केली आहे. मात्र विदर्भातील जागा सोडण्याची भाजपची फारशी तयारी नाही.
मात्र घटकपक्षांना अपेक्षित असलेल्या जागा शिवसेनेकडे असल्याने जागावाटपाच्या चर्चेत फारशी प्रगती होऊ शकलेली नाही. शिवसेनेची चारही घटकपक्षांशी चर्चा पूर्ण झालेली नाही. घटकपक्षांसाठी लोकसभेप्रमाणेच भाजप व शिवसेनेने समान जागा सोडाव्यात आणि जागावाटपाचे पूर्वीचे सूत्र कायम रहावे, असा शिवसेनेचा आग्रह आहे. घटकपक्षांसाठी शिवसेनेने अधिक जागा सोडल्यास शिवसेनेचे नुकसान होईल व त्यांना कमी जागा लढवाव्या लागतील. त्यामुळे हा गुंता सोडविण्यासाठी शिवसेना-भाजपमधील जागावाटपाचा निर्णय आधी घ्यावा लागणार आहे.

Story img Loader