विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत शिवसेना-भाजपचे काही नेते घटक पक्षांशी स्वतंत्रपणे वाटाघाटी करीत आहेत. परंतु निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते, तरीही अजून जागावाटपाबाबत एकत्रित अशी ठोस चर्चा होत नसल्याने घटक पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. कोणत्या पक्षाला कोणते मतदारसंघ सुटणार आहेत, याचा लवकर निर्णय झाला तर, त्या-त्या पक्षाला पुढील तयारी करायला सोपे जाणार आहे, त्यामुळे जागवाटपाची एकत्रित चर्चा लवकर सुरू करावी, अशी या पक्षांची मागणी आहे.
महिन्याभरापूर्वी महायुतीतील शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्षाची केवळ जागावाटपांबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतरही भाजप व शिवसेना यांच्यातच कुणी किती जागा लढवायच्या आणि मुख्यमंत्री कोणाचा होणार, यावरच चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे लहान घटक पक्षांमध्ये नाराजी आहे. महायुतीच्या जागा वाटपात योग्य वाटा मिळाला पाहिजे, अशी या पक्षांच्या नेत्यांची मागणी आहे.
लहान पक्षांची नेमकी किती व कोणत्या जाागांची मागणी आहे, याची चाचपणी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे चर्चा सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. राजू शेट्टी यांनी त्यांच्या पक्षाला ३८ जागा मिळाल्या पाहिजेत असा आग्रह धरला. शिवसेना वा भाजपला ज्या जागा कधीच जिंकता आल्या नाहीत, अशा मतदारसंघांवर आम्ही दावा केला आहे, त्या जागा सोडायला काही हरकत नाही, अशी मागणी केल्याचे राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी शनिवारी भाजपच्या आमदार पंकजा मुंडे व शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी चर्चा केली. त्यावेळी जानकर यांनीही जवळपास ४० जागांवर दावा केला. त्यात काही कमी जास्त होईल, परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करण्याची आमची भूमिका आहे, असे जानकर यांनी सांगितले. महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसून जागा वाटपाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी या नेत्यांनी मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा