लोकसभेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला असता राज्यात निर्विवाद यश प्राप्त करणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांनी २२५च्या आसपास विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
लोकसभा निकालाचीच शंभर टक्के पुनरावृत्ती विधानसभेच्या वेळी होण्याची शक्यता नसली तरी महायुतीच्या बाजूने मिळालेला कल हा सत्ताधाऱ्यांसाठी निश्चितच तापदायक ठरणारा आहे. राज्यात ४२ जागा जिंकून महायुतीने आघाडीच्या नेत्यांची पुरती झोपच उडविली आहे. लोकसभा निवडणुकीत विधानसभासंघ निहाय मतांमध्ये महायुतीने जवळपास २२५ मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार फक्त ५०च्या आसपास मतदारसंघांमध्येच आघाडीवर राहिले आहेत.
सत्ताधारी आघाडीच्या बहुतेक दिग्गजांच्या मतदारसंघांमध्ये विरोधी उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दिंडोशीतील उमेदवार डॉ. भारती पवार या तब्बल ५० हजारांहून मागे पडल्या. स्वत: भुजबळ नाशिकमधील सर्व सहाही मतदारसंघांमध्ये मागे राहिले. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली मतदारसंघात त्यांचे पुत्र निलेश यांना निसटती आघाडी मिळाली. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील या काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या मतदारसंघांत काँग्रेस उमेदवाराला आघाडी मिळाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात तटकरे यांना तीन हजारांची आघाडी मिळाली. बारामती सुप्रिया सुळे यांना गेल्या वेळी सुमारे साडेतीन लाखांचे मताधिक्य मिळाले होते. यंदा फक्त ७० हजार मतांची आघाडी मिळाली. सुळे या दोन विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर राहिल्या आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये मागे पडले. जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे तीन हजार मतांनी पराभूत झाले. मात्र त्याच वेळी सुनील तटकरे या नावाच्या अपक्ष उमेदवाराला तब्बल नऊ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली.
महायुतीच्या २० पेक्षा जास्त विजयी उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघांतील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे साताऱ्यातील विजयी उमेदवार उदयनराजे भोसले यांनाही सहाही मतदारसंघांत चांगली आघाडी मिळाली.
बारामतीला महायुतीचा राजकीय हादरा
पवार घराण्याचे निर्विवाद अधिराज्य असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला महायुतीने पहिल्यांदाच मोठा राजकीय धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला, परंतु त्यांच्या मताधिक्यात लक्षणीय घट झाली आहे. महायुतीचे महादेव जानकर यांनी निकराची झुंज देऊन या वेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादीला जेरीस आणले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. २००४ पर्यंत पवार यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार असायचे. परंतु भाजपला कधीही दोन-सव्वा दोन लाखाच्या पुढे मते घेता आली नाहीत. पवारही दोन-अडिच लाखाच्या फरकाने नेहमी निवडून येत. बारामती मतदारसंघात विरोधक केवळ उपचार म्हणूनच निवडणूक लढवित होते.
मागील २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी स्वत माढा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि आपला बारामती हा पारंपारिक मतदारसंघ आपली कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मोकळा करुन दिला. सुप्रिया यांच्याविरोधात भाजपच्या कांता नलावडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी सुप्रिया यांना ४ लाख ८७ हजार ८२७, तर कांता नलावडे यांना १ लाख ५० हजार ९९६ मते मिळाली होती. म्हणजे ३ लाख ३६ हजार ८३१ इतक्या प्रचंड मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या.
या वेळी भाजप-शिवसेना-रिपब्लिकन-स्वाभीमानी शेतकरी संघटना-राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीच्या वतीने महादेव जानकर यांना बारामतीच्या मैदानात उतरविले होते. जानकर यानी गेल्या वेळी माढामध्ये शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवून स्वबळावर तब्बल ९८ हजार ९४६ मते घेतली होती. या वेळी त्यांना भाजप-शिवसेनेचे पाठबळ होते. त्यांनी बारामतीत निकराची झुंज दिली. त्याचा परिणाम म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यात प्रचंड घट झाली. सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२ तर जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली. म्हणजे अवघ्या ६२ हजार ७१९ मतांनी सुप्रिया यांचा विजय झाला. शिवाय आपचे सुरेश खोपडे यांना २६ हजार ३९६ आणि बसपला २४ हजार ९०८ मते मिळाली. पवार घराण्याच्या बालेकिल्ल्याला हा राजकीय हादरा असल्याचे मानले जात आहे.

Story img Loader