देशपातळीवरील निकालांची पुनरावृत्ती राज्यातही होऊन भाजप-शिवसेना महायुतीने ४२ जागा जिंकून ऐतिहासिक पण अनपेक्षित असे यश मिळविले. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पार धुव्वा उडाला असून, काँग्रेसला अवघ्या दोनच जागांवर समाधान मानावे लागले.
महायुतीला मिळालेल्या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या नेत्यांच्या आशा पलल्वीत झाल्या आहेत. राज्यातील ४८ पैकी भाजपला सर्वाधिक २३ जागा मिळाल्या. शिवसेना (१८), स्वाभिमान शेतकरी संघटना (एक) अशा महायुतीचे एकूण ४२ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेसचे दोन असे आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले. छगन भुजबळ, सुनील तटकरे, शिवाजीराव मोघे आणि संजय देवतळे हे लोकसभेच्या रिंगणात उतरलेले चारही मंत्री पराभूत झाले. मनसेला भोपळाही फोडता आला नाही, तर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना हजारांमध्येच मते मिळाली. मुंबईतील सहाही मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आले. गेल्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सहाही उमेदवार निवडून आले होते. १९९८चा अपवाद वगळता मुंबईचा कौल हा साधारपणे एकाच पक्षाच्या बाजूने असतो. हा कल यंदा कायम राहिला. उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाळ शेट्टी हे सुमारे साडेचार लाख मतांनी विजयी झाले. दोन लागोपाठ पराभवांनंतर किरीट सोमय्या यांना लॉटरी लागली.  
विदर्भातील दहाही जागा महायुतीने जिंकल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये प्रथमच संघाचा स्वयंसेवक निवडून आला. भाजपचे नितीन गडकरी सुमारे अडीच लाखांनी विजयी झाले. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा भाजपच्या नाना पटोले यांनी पराभव केला.
मराठवाडय़ातील आठपैकी सहा जागा महायुतीला मिळाल्या. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे, जालन्यात दानवे या महायुतीचे नेते विजयी झाले. उस्मानाबादमध्ये माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा दारुण पराभव झाला. लातूरचा गड राखण्यात अमित देशमुख यांना शक्य झाले नाही. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विजय मिळवून ‘आदर्श’ हा मुद्दाच नांदेडमध्ये नाही हे दाखवून दिले. हिंगोलीत अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे राजीव सातव हे १८०० मतांनी विजयी झाले.
पश्चिम महाराष्ट्रातील १२ पैकी नऊ जागा जिंकून महायुतीने राष्ट्रवादी-काँग्रेसला मोठा धक्का दिला. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य घटले. शरद पवार यांनी प्रतिनिधीत्व केलेली माढय़ाची जागा कायम राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. सांगलीची जागा भाजपने काँग्रेसकडून हिसकवून घेतली.
उत्तर महाराष्ट्रातील सहाही जागा महायुतीने जिंकल्या. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसला पारंपारिक नंदुरबारची जागा गमवावी लागली. कोकणातील दोन्ही जागा युतीने जिंकल्या. ठाणे जिल्ह्य़ातील चारही जागा महायुतीने जिंकल्या.