मी मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची स्वाभाविक भावना आहे. मात्र महायुतीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मांडली. मुख्यमंत्रिपदी माझा चेहेरा आहे की नाही यापेक्षा मी समृद्ध महाराष्ट्राचा चेहरा पाहात असल्याचे उद्धव यांनी सांगितले.शिवसेनेचे दोन दिवसांचे राज्यव्यापी शिबीर तसेच ४८वा वर्धापनदिन वांद्रे येथील रंगशारदा येथे साजरा करण्यात आला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव यांनी कोणत्याही परिस्थितीत राज्यात आमचीच सत्ता येईल आणि सत्ता आल्यानंतर मुंबईसह राज्यात विकासाच्या विविध योजना राबविण्यात येतील, असे सांगितले. मुंबईसाठी सागरी किनारा मार्ग, कोळीवाडय़ांचा विकास, रेसकोर्सवर थीमपार्क, मुंबईच्या पूर्व किनाऱ्याच्या विकासाबरोबर ग्रामीण भागाच्या विकासासाठी ठोस योजना राबविण्यात येतील, असे उद्धव म्हणाले. विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबत काहीही न सांगता शिवसेनेची टीम मजबूत होत असून, राज्यभर निवडणुकीसाठी संघटनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.