कडक उन्हाळा त्यातच पावसाचे आगमन लांबल्याने जीवाच्या होणाऱ्या काहिलीमुळे ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया असतानाच सरकारने पैसे भरावे, पण विजेचे भारनियमन रद्द करा, अशी भूमिका मांडत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मोठय़ा प्रमाणावर भारनियमन होणारी शहरे तसेच ग्रामीण भागातील मतदारांना आपलेसे करण्याची नवी खेळी केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा आढावा घेताना वीज भारनियमन, स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) आणि अन्न सुरक्षा कायदा करूनही गरिबांना अन्नधान्य न मिळणे ही कारणे जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. पाऊस यंदा विलंबाने सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पेरण्यांचे दिवस जवळ आले आहेत. अशा वेळी भारनियमन केल्यास शेतकऱ्यांचे हाल होतील. हे टाळण्यासाठी सरकारने वीज कंपन्यांना पैसे द्यावेत, पण नागरिकांची भारनियमनातून सुटका करावी, अशी सूचना करीत शरद पवार यांनी मराठवाडा, खान्देश भागांतील मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक संस्था करावरून (एल.बी.टी.) व्यापाऱ्यांमध्ये असलेली नाराजी आपल्याला लोकसभेत महागात पडली. एल.बी.टी. करही रद्द झाला पाहिजे व त्यासाठी पक्षाच्या मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. वीज भारनियमन रद्द होणे आणि एल.बी.टी. रद्द करणे या दोन बाबींवर तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाचा निर्णय लवकर घ्या
कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता किंवा कोणाच्या ताटातील भाकरी न काढता मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकर झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. धनगर समाजासाठी आरक्षणाचा व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे निर्णयही तात्काळ घेण्याची सूचना त्यांनी केली. नेते आणि जनतेतील अंतर वाढले
सर्वसामान्य जनता आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये अंतर वाढले आहे. याचा फटका लोकसभेत आपल्याला बसला. नेतेमंडळींनी जरा जमिनीवर यावे, असे आवाहन पवारांनी केले.
सोळावे वरीस धोक्याचे..
पक्षाचा १५वा वर्धापनदिन आहे, असे सांगतानाच त्यांनी क्षणभर पॉझ घेतला आणि नव्या वर्षांत पदार्पण करताना काळजी घ्यावी लागेल, असा सल्ला त्यांनी देताच एकदम हशा पिकला.
सामाजिक तेढ आणि पोलीस
केंद्रात भाजपचे सरकार सत्तारुढ झाल्यापासून काही शक्तींमध्ये वेगळीच हवा तयार झाली. त्यातूनच राज्यात सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यात एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आली. महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण यापूर्वी असे कधीही नव्हते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जागरुक राहून हे प्रयत्न हाणून पाडावेत, असे आवाहन पवार यांनी केले. संवेदनशील पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना खबरदारी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.
..पण राज्य भारनियमनमुक्त करा – पवार
कडक उन्हाळा त्यातच पावसाचे आगमन लांबल्याने जीवाच्या होणाऱ्या काहिलीमुळे ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांबाबत संतप्त प्रतिक्रिया असतानाच सरकारने पैसे भरावे
First published on: 09-06-2014 at 12:38 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make load shedding free state sharad pawar