लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असतानाच बुधवारी सभागृहातील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन औपचारिकपणे विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला.
यूपीएच्या ६० खासदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन लोकसभा अध्यक्षांना सादर करण्यात आले असून आता त्याबाबतचा निर्णय सुमित्रा महाजन यांनी घ्यावयाचा आहे, असे खरगे यांनी वार्ताहरांना सांगितले. या वेळी काँग्रेसचे उपनेते अमरिंदरसिंग आणि पक्षाचे मुख्य प्रतोद ज्योतिरादित्य शिंदे खरगे यांच्यासमवेत होते.
यूपीएच्या ६० खासदारांचे स्वाक्षरीचे निवेदन महाजन यांना सादर करण्यात आल्याने विरोधी पक्षनेतेपदाबाबत त्वरेने निर्णय घेण्यासाठी कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असून केंद्रीय दक्षता आयुक्त आणि लोकपाल यांच्या नियुक्त्यांसारख्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्त्वाची असते, असे कारण निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत पक्षाच्या खासदारांची बैठक मंगळवारी आयोजित केली होती. त्यानंतर बुधवारी खरगे यांनी महाजन यांची याबाबत भेट घेतली.

Story img Loader