भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील आपले एकेकाळचे सहकारी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा न देता येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना सहकार्य करण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे. ‘‘राष्ट्रहितासाठी काय करता येईल, याचच विचार मी नेहमी करतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल व नरेंद्र मोदी यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतलेला आहे,’’ असे हजारे यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी बुधवारी अण्णा हजारे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विस्तृत चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. अण्णांनी यावेळी ममतांची तोंडभरून प्रशंसा केली. ‘‘ममता बॅनर्जी या देशातील एक सच्च्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री असलेल्या ममता ऐषोआरामात जीवन जगू शकल्या असत्या. मात्र त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. त्या नेहमी देश व समाजहिताचाच विचार करतात. त्यांचे काम नेहमी समाजासाठीच असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे’’ असे अण्णांनी सांगितले. राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या नेत्यालाच माझा पाठिंबा राहील. सुप्रशासनासाठीचे माझे १७ मुद्दे केवळ ममता बॅनर्जी यांनीच मान्य केले आहेत, असे अण्णा म्हणाले.

पाठिंबा न देण्याचे कार्यकर्त्यांचे आवाहन
अण्णा हजारे यांच्या तृणमूल काँग्रेसचा प्रचार करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविणारी अनेक पत्रे महिला चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी हजारे यांना पाठविली आहेत. या निर्णयाबाबत पत्रांमधून नाराजीचा सूर लावण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आपण घेतल्याने धक्का बसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.