शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरी सेवेशी संबंधित नव्या अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपच्या लोकार्पणाचा घाट घालून शाब्बासकी मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापौरांना पालिकेतील विरोधकांनी शनिवारी शह दिला. विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी कार्यक्रमापूर्वीच पालिका मुख्यालयात दुपारी पत्रकार परिषद घेऊन या अ‍ॅपचे लोकार्पण केले. मात्र त्यानंतर सायंकाळी महापौरांनी लोकार्पण सोहळा उरकून घेतला.
मुंबईकरांना जलदेयके, मालमत्ता कर, अनुज्ञापन विभागाची देयके, विविध प्रकारची स्थानिक कर देयके मोबाइलवरुन भरता यावीत यासाठी ‘एमसीजीएम २४ वाय ७’ हे अत्याधुनिक मोबाइल अ‍ॅप्लीकेशन उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या अ‍ॅपचे लोकार्पण करण्याचा निर्णय महापौर सुनील प्रभू यांनी घेतला आणि तसे आमंत्रणाचे पत्र सर्व गटनेत्यांना पाठविले. या प्रकारामुळे विरोधी पक्षाचे नेते संतप्त झाले होते.
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिकेचे नवे अ‍ॅप विरोधी  पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या मोबाइलवर डाऊनलोड केले. त्यानंतर देवेंद्र आंबेरकर, संदीप देशपांडे, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ आणि समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात दुपारी २ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली. यामध्ये आंबेरकर यांच्या हस्ते या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले.
करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांतून हे अ‍ॅप तयार केले असून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याचे लोकार्पण करण्याची काय गरज होती. या विषयावर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा न करताच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पालिकेच्या तिजोरीतील पैशांची कार्यक्रमांवर उधळपट्टी करीत आहेत, असा आरोप देवेंद्र आंबेरकर यांनी केला.
 हे नवे अ‍ॅप केंद्र सरकारने महापालिकेला बनवून दिले आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आहे. सत्ताधारी त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली. या कार्यक्रमांचे शिवसेनाकरण होऊ लागले आहे, अशी टीका रईस शेख यांनी केली.
पालिका म्हणजे शिवसेनेची शाखा नाही आणि उद्धव ठाकरे हे राष्ट्रपुरुष नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून पालिकेचे अपॅ लोकार्पण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
-धनंजय पिसाळ,राष्ट्रवादीचे गटनेते

Story img Loader