विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्राची विशेष माहिती किंवा ज्ञान असलेल्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी घटनेत तरतूद असली तरी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याकरिता समाजसेवा व सहकार चळवळ या तरतुदींचा आधार सत्ताधाऱ्यांकडून घेतला  जातो.
विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड करण्यासाठी घटनेत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. घटनेच्या १७१ कलमातील पाचव्या कलमात कोणत्या निकषांवर या नियुक्त्या केल्या जाव्यात याच्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. साहित्य, विज्ञान, कला, सहकार आणि समाजसेवा किंवा सामाजिक कार्य या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या किंवा तज्ज्ञांची नियुक्ती केली जावी, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पण समाजसेवा या तरतुदीचा आधार घेत राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची परंपराच आहे. आताही नियुक्ती करण्यात आलेल्या दहा जणांमध्ये एकही साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रातील तज्ज्ञ नाही. दहाही जणांची समाजसेवा या क्षेत्रातील जाणकार या निकषातच नियुक्ती करण्यात आली आहे.  साहित्य किंवा कला क्षेत्रातील ग. दि. माडगूळकर, ना. धों. महानोर, कवी शांताराम नांदगावकर, लेखिका सरोजनी बाबर यांची यापूर्वी राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती झाली होती. काँग्रेसने कवी रामदास फुटाणे यांना विधान परिषदेवर निवडून आणले होते. संतती नियमनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शकुंतला परांजपे यांनीही राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून काम केले होते.
२००८ मध्ये राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाच राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून संधी देण्यात आली होती. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्या सदस्यांची मुदतही संपली.

नियुक्त झालेले सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस
*विद्या चव्हाण – महिला प्रदेशाध्यक्ष. पूर्वाश्रमीच्या जनता दलातील चव्हाण यांचे  महिला आणि झोपडपट्टय़ांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार असतो. तीन वर्षेच आमदारकीची संधी मिळाल्याने पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे
 ’ख्वाजा बेग – यवतमाळ जिल्ह्य़ातील जुने पदाधिकारी.
*रामराव वडकुटे – मराठवाडय़ातील पक्षाचे पदाधिकारी. शेळी-मेंढी मंडळाचे सध्या अध्यक्ष. बारामतीमध्ये धनगर समाज विरोधात गेल्याने या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. त्यातून संधी.
*प्रकाश गजभिये – नागपूरचे गजभिये हे पक्षाच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष.
*राहुल नार्वेकर – फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना नेतृत्वाला अंधारात ठेवून माघार घेतली होती. राष्ट्रवादीत प्रवेश करून मावळ मतदारसंघातून अलीकडेच निवडणूक लढविली. तेव्हा माघार घेतल्याची आता बक्षिसी. इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असलेल्या नार्वेकर यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी.
*जगन्नाथ शिंदे – औषध विक्रेत्यांच्या संघटनेचे अध्यक्ष.
काँग्रेस
*जनार्दन चांदूरकर – मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष. आगामी विधानसभा लढायची नसल्याने ही व्यवस्था.
*आनंदराव पाटील – सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय.
*उस्नोबानो खलिफे – मूळच्या काँग्रेसच्या पण पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेत प्रवेश. राजापूरचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या खलिफे राणे यांच्याबरोबरीने काँग्रेसमध्ये परतल्या होत्या.
*रामहरी रुपनवार – सोलापूर जिल्ह्य़ातील धनगर समाजातील पक्षाचे पदाधिकारी असलेले प्रदेशाध्यक्षांच्या जवळचे.

 मुख्यमंत्रिपद मिळवायचेच, या निर्धाराने अजित पवार हे रिंगणात उतरले असतानाच राज्याचे मुख्यमंत्रिपद शरद पवार यांनीच स्वीकारावे, असा सूर पक्षाच्या जिल्’ाातील नेत्यांनी लावला आहे. अजित पवार यांच्या नावाला पसंती नाही, असा संदेश त्यातून गेला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी पक्षाच्या मुख्यालयात जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा उपक्रम शुक्रवारपासून सुरू केला आहे. पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी, आपणच मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली. या मागणीवर अन्य कोणीही मतप्रदर्शन केले नाही. हा प्रश्न म्हणजे नाजूक जागेचे दुखणे असल्याने कोणीही काही भाष्य केले नाही, असे या बैठकीत उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. नागपूरच्या काही पदाधिकाऱ्यांनीही असाच सूर लावला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकांचा आक्षेप आहे. पक्षात आतापर्यंत सारे निर्णय त्यांच्या कलाने होत असल्याने कोणीही अजितदादांच्या विरोधात अवाक्षरही काढत नव्हते. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीची सारी सूत्रे शरद पवार यांनी हाती घेतल्याने पक्षातील पदाधिकारी मन मोकळे करू लागले आहेत. १९९६ पासून राष्ट्रीय राजकारणात असलेले व गेली दहा वर्षे केंद्रात कृषी खाते भूषविलेले शरद पवार हे राज्याच्या राजकारणात परतण्याची सुतराम शक्यता नाही. पण अजित पवार यांच्याबाबत पक्षात सारे काही आलबेल नाही हा संदेश पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तशी भावना त्यांनी बैठकीत बोलून दाखविल्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Story img Loader