काशी विश्वनाथाच्या भूमीवर वसलेल्या वाराणसीकरांकडे मतं मागण्यासाठी नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती यांच्यासारखे सर्वच प्रमुख नेते रस्त्यावर उतरले. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल -देखील त्याला अपवाद नाहीत. याउलट कमी वेळेत जास्तीत जास्त गर्दी खेचणाऱ्या केजरीवाल यांचे गारूड वाराणसीकरांवर असल्याचे वरवर दिसते. पण हे वाटते तसे नाही. वाराणसीचीच नव्हे तर यंदा लोकसभेची निवडणूक लढविण्यामागे अरविंद केजरीवाल यांचा उद्देश स्पष्ट आहे. त्यामुळेच गतवर्षी दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐन हिवाळ्यात भल्याभल्या विरोधी उमेदवारांचा घाम काढणाऱ्या ‘आप’मध्ये  वाराणसीत समन्वयाचा अभाव दिसत आहे.
भाजप, काँग्रेस, सपा, बसपाच्या तुलनेत आम आदमी पक्षाचे वाराणसीतील कार्यालय म्हणजे झोपडीतील संसार! टळटळीत दुपारी वाराणसीच्या प्रमुख लहुराबीर चौकातून दहा मिनिटे सायकल रिक्षाने गेल्यास मलदहिया चौकात छोटेखानी बोळात एका जुनाट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आम आदमी पक्षाचे कार्यालय आहे. ‘प्रेम सागर’ भवनाच्या रंग उडालेल्या भिंती, अस्वच्छ पायऱ्या पाहून या जागेचे मासिक भाडे किती असेल, याची कल्पना करता येऊ शकते. दोन छोटय़ा खोल्या एकत्र केल्याने तयार झालेली एक मोठी खोली. खोलीला व्यापणारी एक मोठ्ठी सतरंजी. त्यावर पहुडलेले चार-पाच मध्यमवयीन कार्यकर्ते. खोलीत एक टेबल. त्यावर एक संगणक. टेबलासमोरील प्लास्टिकच्या खुर्चीवर स्वत:ची घडी घालून झोपण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता.
अशोक प्रजापती. शहाजनपूरहून वाराणसीत आले. अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात प्रचार केल्यानंतर तडक वाराणसीत दाखल झाले. पण अजूनही त्यांना जबाबदारी सांगितली गेली नाही. प्रजापती माहिती अधिकार कार्यकर्ते. ‘केजरीवाल यांच्याशी प्रत्यक्ष एकदाही संवाद नाही. पण त्यांच्यासाठी आलो,’ प्रजापती सांगतात. कोणत्याही परिस्थितीत पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून द्यायची हे आपचे उद्दीष्ट आहे.  केजरीवाल प्रत्येक ठिकाणी जाऊ शकले नाहीत. अन् त्यांच्याइतकी मोहिनी घालू शकेल, असा एकही नेता ‘आप’कडे नसल्याची खंत प्रजापती व्यक्त करतात. येथेही दिल्लीइतकाच उत्साह आहे; कुतूहल आहे. अभाव आहे फक्त समन्वय व व्यवस्थापनाचा!  ‘आप’ची यंत्रणा कामाला लागली, पण केवळ शहरापुरतीच. वाराणसीचे १३ भाग करण्यात आले असून २०० स्वयंसेवक येथे नुक्कड, चौकसभा आदी पद्धतींनी प्रचार करीत आहेत.