लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन गटांची झालेली वाताहत लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व आंबेडकरवादी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांकडून तसेच संघटनांकडून करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने शिवसेना-भाजपशी युती केली. त्यांच्या गटाला साताऱ्याची फक्त एकच जागा सोडण्यात आली आणि तिथे त्यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. प्रकाश आंबेडकर व डॉ. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील पक्षांनी स्वंतत्र निवडणुका लढविल्या. त्यांनाही पराभवाशिवाय काहीही हाती लागले नाही. प्रा. जोगेंद्र कवाडे व इतर काही लहान-मोठय़ा गटांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. परंतु दोन्ही काँग्रेसचीच इतकी पिछेहाट झाली, की  त्यात चिल्लर रिपब्लिकन गट कुठल्या कुठे फेकले गेले. प्रत्येक निवडणुकीत खाते खोलण्याचा दावा करणाऱ्या बसपलाही पराभवाच्याच तडाख्याला तोंड द्यावे लागले. लोकसभा निवडणुकीत आंबेडकरवादी पक्षांची पूर्णपणे वाताहात झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत तरी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व आंबेडकरवादी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे अध्यक्ष राजाराम खरात यांनी केले आहे. सर्व आंबेडकरवादी पक्ष एकत्र आल्यास विधानसभा निवडणुकीतील निकालाचे चित्र वेगळे दिसेल, असे त्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत फेसबूक आंबेडकराईट मुव्हमेंट या तरुणांच्या संघटनेच्या वतीने रिपब्लिकन ऐक्याऐवजी रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट व बसप यांनी युती करावी असे प्रयत्न केले होते. त्याला फक्त अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्याकडून  व अमरावतीत डॉ. राजेंद्र गवई यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला होता. परंतु त्यांना राजकीय यश मिळाले नाही. अशी व्यापक स्वरुपात आघाडी झाली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन-बसप युती निर्णायक शक्ती ठरेल, असा या तरुणांचा दावा आहे.

Story img Loader