शनिवार-रविवारची सुट्टी त्यात मंत्रिमहोदय दौऱ्यावर, त्यामुळे सोमवारी कार्यालयात निवांत येणे हा दिल्लीकर बाबूूंचा नियम आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा अलिखित नियम पाळणाऱ्या बाबूंना आज माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी धडा शिकवला. सकाळी साडेनऊच्या सुमारास मंत्रालयात दाखल झालेल्या जावडेकर यांनी आपल्या दालनात न जाता कर्मचाऱ्यांच्या दालनांची झाडाझडती घेतली. कार्यालयाची वेळ अध्र्या तासाने उलटल्यावरही खुच्र्या रिकाम्याच. दोन-चार अधिकारी नुकतेच स्थिरस्थावर झाले होते. वेळेवर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेटायला पाठवा, अशी तंबी देऊन जावडेकर आपल्या दालनात गेले नि सुरू झाली शिस्तभंगाची कारवाई!
 पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी पंतप्रधान कार्यालयात आणलेल्या शिस्तीचे पडसाद अन्य मंत्रालयांमध्येही उमटू लागले आहेत. जावडेकरदेखील आपल्या कार्यालयात सकाळी सव्वानऊ वाजता दाखल झाले. दोन-तीन-चार नव्हे तर तब्बल चाळीसेक कर्मचारी नियोजित वेळ उलटून दहा वाजले तरी गैरहजर होते. कार्यालयाची निर्धारित वेळ सकाळी सव्वानऊची आहे. इतक्या मोठय़ा संख्येने कर्मचारी गैरहजर असल्याचे पाहून जावडेकर यांचा पारा चढला.कर्मचाऱ्यांना जाब विचारून उद्यापासून वेळेवर हजर राहण्याची तंबी जावडेकर यांनी दिली.आजचा दिवस तुम्ही घरीच थांबा, असे सांगून या कर्मचाऱ्यांना रजा घ्यायला लावली. मंत्रिमहोदय कार्यालयात किती वाजता दाखल होतील, याची माहिती आम्हालाही नव्हती, असे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.