राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी प्रचारासाठी अमृतसरमध्ये एका ‘रोड शो’मध्ये सहभाग घेतला खरा, मात्र त्यात काही गॅसच्या फुग्यांचा स्फोट झाल्याने प्रचारास गालबोट लागले. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील त्यांचा सहकारी शिरोमणी अकाली दल यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती.
भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याच्याऐवजी अमृतसरमधून जेटली निवडणूक लढवणार आहेत. तीन वेळा राज्यसभेचे खासदारपद भूषविलेल्या जेटली यांची लोकसभा लढविण्याची पहिलीच वेळ आहे. मंगळवारी अमृतसर येथे शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्या संयुक्त ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते. ज्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल जोशी गॅसने भरलेले फुगे घेऊन आले होते. ट्रक नॉव्हेल्टी चौकात आला असताना अचानक या फुग्यांचा स्फोट झाला. त्यात जेटली यांना दुखापत झाली नसली तरी अनिल जोशी यांच्या चेहऱ्यास मात्र काही ठिकाणी इजा झाली.