पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून द्रमुकचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी आपला मोठा मुलगा एम के अळ्ळगिरी यांची मंगळवारी पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. पक्षाची लोकसभेसाठीची प्रचारमोहीम उद्या, बुधवारपासून सुरू होणार आहे. त्याच्या एकदिवस आधी अळ्ळगिरींची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा पक्षप्रमुख करुणानिधी यांनी केली.
पक्षाचे महासचिव आणि आपण या प्रकरणी सविस्तर चर्चा केल्यानंतर अळ्ळगिरीला पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती करुणानिधी यांनी पत्रकारांना दिली. या वेळी करुणानिधी यांच्यासोबत त्यांचा धाकटा मुलगा एम के स्टॅलिन हेदेखील होते.
पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी तसेच लहान भाऊ स्टॅलिनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या अळ्ळगिरी यांना दोन महिन्यांपूर्वी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी करुणानिधी यांनी सांगितले की, अळ्ळगिरीला निलंबनानंतर स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले होते. मात्र कोणतेही स्पष्टीकरण न देता पक्षावर तसेच पक्षनेतृत्वावर टीका करण्याचे धोरण त्याने अवलंबिले होते. त्यामुळेच त्याला पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे करुणानिधी यांनी सांगितले.
पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर अळ्ळगिरी यांनी विविध मतदारसंघांतील आपल्या समर्थकांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यावर डीएमकेच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले.

 

 

Story img Loader