लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फटका बसणार हे लक्षात घेऊन एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तर ‘मोदी नामो’च्या जपाचा फारसा फायदा लोकसभेतही मिळणार नाही, आणि विधानसभेतही उपयोग होणार नाही, हे लक्षात घेऊन मनसेने मराठी मते एकवटण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. मराठी मतांचे गणित बांधताना विकासाच्या ‘राजमार्गा’वरून चालण्याचे काम मनसेकडून विधानसभा निवडणुकीत केले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी अवघ्या १० जागा लढवल्या. महायुतीत जागा मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर पक्षाच्या वर्धापनदिनी माझे खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, अशी भूमिका घेऊन मतदारांत संभ्रम निर्माण करण्याचा ‘राज’कीय डावही टाकला. तथापि मोदींच्या प्रभावी प्रचारतंत्राने मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकसारख्या शहरी भागातील गुजराती व सुशक्षित मराठी समाज महायुतीकडे एकगठ्ठा वळणार असे चित्र निर्माण झाले. मोदीमय वातावरणात मराठी कार्ड हातून निसटू नये तसेच गुजराती समाजावरही वचक राहावा यासाठी शिवसेनेने महाराष्ट्रदिनी ‘सामना’मधून गुजराती समाजाला इशारा दिला आणि सेनेतच एक अस्वस्थता पसरल्यानंतर ‘मराठी-गुजराती भाई भाई’चा नारा सेना नेतृत्वाने दिला.
याचाच फायदा घेत मनसेने बेस्टच्या जाहिरातींमधील गुजराती ‘संदेशा’चा फायदा उठवत मुंबईचा विकास मराठी माणसाने केला की गुजराती माणसांनी, असा सवाल करून शिवसेनेची ‘बेस्ट’ कोंडी केली. हा केवळ ‘बेस्ट’मधील ‘सामना’ नव्हता तर मनसे लढाई असल्याचा ‘संदेश’ राज यांच्या निकटवर्तीय आमदाराने दिला आहे.  विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा घेऊन राज ठाकरे उतरणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गेली काही वर्षे चर्चेत असलेली महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ ऑगस्टमध्ये राज ठाकरे जाहीर करणार असून शिक्षण, पाणी, सिंचन, वाहतूक, पायाभूत सुविधा यांचे राज्य शासनाने वाजवलेले ‘बारा’ यांचा पर्दाफाश प्रचारात केला जाणार आहे.  कमकुवत पक्षबांधणी ही मनसेच्या दृष्टीने चिंतेची बाब असून त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरपक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वाचे फेरबदल करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
ज्या पद्धतीने जाहिरातबाजी झाली ती खपवून घेतली जाणार नाही, असे आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितले. मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा मनसेने हातात घेतला असून मराठी माणसाला सांभाळायचे तर गुजराती नाखूष आणि गुजराती समाजाला चुचकारायला गेले तर मराठी माणूस दुखावणार अशा कोंडीत शिवसेना सापडली आहे.

Story img Loader