‘विधानसभा निवडणूक स्वबळावरच’ ही भूमिका यापूर्वीच जाहीर केलेल्या राज ठाकरे यांची ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढविणार आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत राज यांनी विभागनिहाय जागांचा आढवा घेतला असून मुंबई, नाशिक, पुणे येथील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतानाच दहा जागा मनसेने लढविल्या. त्याचप्रमाणे शिवसेनेला विरोध व भाजपला आतून मदत असेल काहीसे चित्र लोकसभा निवडणुकीत निर्माण झाले होते. मोदी लाट तसेच कमी जागा लढण्याचा फटका लोकसभा निवडणुकीत मनसेला बसला. मनसेच्या सर्व उमेदवारांवर अनामत रक्कम गमाविण्याची नामुष्की आली तर आता मोदी लाटेवर स्वार होऊन राज्याची सत्ता मिळविण्याचे स्वप्न सेना-भाजप पाहू लागली आहे. देशात भाजपची सत्ता असल्यामुळे त्याचाही फायदा राज्यात मिळणार हे लक्षात घेऊन मनसे आपली रणनिती निश्चित करत असून विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढविणार असल्याचे मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १४३ जागा लढविल्या होत्या. मनसेला २५ लाख ८५ हजार मते मिळून तेरा आमदार विजयी झाले होते. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास ५.७१ टक्के मते मनसेला मिळाली, तर भाजपला १४ टक्के आणि शिवसेनेला १६ टक्के मते मिळाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला ३७ टक्के मतदान झाले होते.

Story img Loader