पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी नेत्यांसमवेत चर्चा करताना हिंदी भाषेतूनच संभाषण करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पंतप्रधानांसमवेत होणाऱ्या सर्व बैठकांसाठी दुभाषकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी पाहुणे इंग्रजीत बोलत असले तरी मोदी मात्र हिंदीतूनच संभाषण करतात आणि त्यावेळीही दुभाषक उपस्थित असतो.
मोदी यांना इंग्रजीची उत्तम जाण असल्याने दिल्लीस्थित अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांशी संभाषण करताना त्यांच्यासमोर भाषेची समस्या कधीही उभी ठाकली नाही. मात्र संभाषण करण्यासाठी मोदी यांनी राष्ट्रभाषेचाच वापर करण्याचे ठरविले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांनी इंग्रजी भाषेतून विचारलेल्या प्रश्नांचे हिंदी भाषेत रूपांतर करण्याची गरज तेथे उपस्थित असलेल्या दुभाषकांना पडत नाही, त्यावरूनच मोदी यांना इंग्रजी भाषेची जाण असल्याचे स्पष्ट होत आहे.
श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी मोदी यांच्याशी चर्चा करताना इंग्रजी भाषेचा वापर केला. मात्र राजपक्षे यांना काय म्हणावयाचे आहे ते समजून घेण्यासाठी मोदी यांना दुभाषकाची गरज लागली नाही. मात्र मोदी यांनी आपले संभाषण हिंदीतूनच केल्याने ते राजपक्षे यांना समजून सांगण्यासाठी दुभाषकाची गरज लागली. ओमानचे सुलतान इंग्रजी भाषेतून बोलल्यानंतर मोदी यांनी त्यावेळीही हिंदी भाषेचाच वापर केला.
परंतु जे राजनैतिक अधिकारी हिंदी अथवा ऊर्दू भाषा बोलतात त्यावेळी दुभाषकाची गरज लागत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा करताना ही गरज लागली नाही. अफगाणिस्तानचे अध्यक्ष करझाई यांचे शिक्षण भारतात झाले असल्याने ते हिंदी शब्दांचा वापर करून उर्दू भाषेत बोलले. त्यामुळे त्यावेळीही दुभाषक लागला नाही.
मोदी हे अनेक प्रकारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे अनुकरण करतात, असे बोलले जाते. वाजपेयी हेही मुख्यत्वे हिंदी भाषेतूनच बोलत असत. मात्र इंग्रजी बोलणाऱ्यांशी ते इंग्रजीतून संभाषण करीत.
 काही वेळा पाहुण्यांचे उच्चार न कळल्यास वाजपेयी यांना सहकार्य घ्यावे लागत असे. नव्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मात्र आतापर्यंत इंग्रजी भाषेतूनच बैठकीत चर्चा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा