सार्वत्रिक निवडणुकीत एकहाती घवघवीत विजय मिळविणारे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्रीमंडळाची निवडही एकहातीच करणार असून सर्व सूत्रे त्यांच्या हाती एकवटली आहेत. प्रादेशिक समतोल, जात वगैरे मुद्दय़ांचे दडपण झुगारून मोदी आपले सहकारी निवडणार असल्याने मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी दिल्लीत आलेल्या महाराष्ट्रातील खासदारांचीही निराशा झाली आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी अडून बसलेले आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही निराशा होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत सत्तास्थापनेसाठी घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे खासदार दिल्लीत दाखल झाले. पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांचा अपवाद वगळता सर्वच वरिष्ठ खासदारांना मंत्रिपदाची आशा आहे. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे, माजी आमदार पाशा पटेल यांनी गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावितदेखील कन्या डॉ. हिना यांच्यासमवेत दाखल झाले आहेत. विजयकुमार गावित यांनी खडसे व मुंडे यांच्याशी चर्चा केली. मात्र मोदी हेच मत्र्यांची निवड करणार असल्याने महाराष्ट्रातील नेत्यांनादेखील कुणालाही मंत्रिपदाची हमी देता येत नाही, असे भाजपच्या केंद्रीय नेत्याने सांगितले.
राज्यसभा सदस्यत्व दिल्याने आठवलेंना आता कोणतेही मंत्रिपद न देण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. विशेष म्हणजे बहुमतापेक्षाही डझनभर जास्त खासदार स्वबळावर निवडून आल्याने आरपीआयचा मंत्रिपदासाठी विचार केला जाणार नसल्याचे संकेत भाजप श्रेष्ठींनी दिले आहेत. आठवलेंनी दबाव टाकला तरी काहीही उपयोग नाही, कारण आता सारी सूत्रे मोदींच्या हाती आहेत, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे.
एकाधिकार!
सार्वत्रिक निवडणुकीत एकहाती घवघवीत विजय मिळविणारे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्रीमंडळाची निवडही एकहातीच करणार असून सर्व सूत्रे त्यांच्या हाती एकवटली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-05-2014 at 02:20 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi to have free hand in both govt and party