देवभूमी वाराणसीत मोदी लाटेपेक्षा जातीय समीकरणे प्रभावी ठरली आहेत. सोशल मिडीया, कॉपरेरेट प्रचारतंत्राच्या प्रभावी वापर करून ‘लाट’ आणणारे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनादेखील वाराणसीत जातीय समीकरणे सांभाळावी लागत आहेत. मतदानाच्या पहिल्या सात टप्प्यात रामनामाला टाळून प्रचार करणाऱ्या मोदींना अखेरच्या दोन टप्प्यात धार्मिक प्रतिकांचा आसरा घ्यावा लागला. त्यामुळे फैजाबादमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या पोस्टरसमोर उभे राहून भाषण करणाऱ्या मोदींनी आता वाराणसीत गंगा आरतीचा घाट घातला आहे. मात्र सुरक्षेचे कारण पुढे करून स्थानिक प्रशासनाने मोदींची सभा व गंगा आरतीला परवानगी नाकारली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी परवानगी नाकारणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यास हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
येत्या १२ मे रोजी अखेरच्या टप्प्यात वाराणसीत मतदान होणार आहे. तत्पूर्वी वाराणसीत मोदींची मोठी सभा तसेच गंगा आरती आयोजित करण्याची योजना भारतीय जनता पक्षाने आखली होती. गंगा आरती हा उत्तर भारतीयांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे गंगा आरतीचा मोठा परिणाम मतदारांवर होईल, असा भाजपला विश्वास वाटतो. हिंदूंसाठी वाराणसीचे धार्मिक महत्त्व अबाधित आहे. गंगेच्या विस्तीर्ण तटावर पसरलेल्या वाराणसीकरांचा गंगेशी आत्मीय संबंध आहे. पुराणांमध्ये महत्त्वाचे मानल्या गेलेल्या दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केल्यास हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्याचा भाजपला विश्वास आहे. उत्तर भारतात पराकोटीचा वर्णसंघर्ष असल्याने उमेदवाराची जात प्रभावी ठरते. त्यामुळे मोदींचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप नेते करीत असले तरी मताधिक्यासाठी धार्मिक प्रतीकांचा वापर करण्याची वेळ मोदींवर आली. त्यातूनच गंगा आरतीचा घाट घालण्यात आला.
भाजपने वाराणसीच्या बेनियाबाग मैदानावर मोदींच्या सभेची परवानगी मागितली होती. अल्पसंख्याकबहुल परिसरात असलेले या मैदानावर मोदींच्या सभेमुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा दावा करीत प्रशासनाने परवानगी नाकारली. प्रचारात अहमदाबादनंतर पहिल्यांदाच मोदी गुरूवारपासून वाराणसीत सलग तीन दिवस आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सभा, कार्यकर्त्यांच्या भेटींचे नियोजन आहे.
बेनियाबाग मैदान अल्पसंख्याकबहुल भागात आहे. १९९१ साली या मैदानावर झालेल्या भाजपच्या सभेत नेत्यांनी वादग्रस्त विधाने केली होती. पोलीसांनी मध्यस्थी करून ही सभा विसर्जित करण्यास भाग पाडले होते. भाजप नेत्यांना पोलीस संरक्षणात सभास्थानावरून न्यावे लागले होते. तशी परिस्थिती पुन्हा होवू नये यासाठी परवानगी नाकारण्यात आल्यचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मैदानावर शक्तीप्रदर्शन केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल, अशी भाजपला आशा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा