भारताचा माजी कर्णधार मोहमद अझरुद्दीन यांनी उत्तर प्रदेशऐवजी राजस्थानमधून लढण्यास पसंती दिली आहे. कपिल सिब्बल, अजय माकन या नेत्यांना दिल्लीतून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
काँगेसच्या तिसऱ्या यादीत ५८ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. गेल्या वेळी उत्तर प्रदेशातील मोरादाबाद मतदारसंघातून निवडून आलेल्या अझरुद्दीन यांना निष्क्रियता नडली. परिणामी त्यांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर मतदारसंघाचा आधार घेतला आहे. कपिल सिब्बल, अजय माकन, कृष्णा तीर्थ, संदीप दीक्षित आणि जयप्रकाश अगरवाल या विद्यमान सदस्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडाला असताना काँग्रेसच्या सर्वच विद्यमान खासदारांना पुन्हा निवडून येण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत. हरयाणामध्ये अशोक तन्वर यांना मतदारसंघ बदलून देण्यात आला. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

 

Story img Loader