पुणे आणि लातूर वगळता राज्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर झाली असून माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वादात या मतदारसंघांतील उमेदवार निश्चित होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यावर निर्णय सोपविण्यात आला असून तो एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. रावेर मतदारसंघातील उमेदवार बदलीचा निर्णयही बुधवारी होऊ शकलेला नाही.
पुण्यातून मुंडे यांनी श्रीकांत शिरोळे यांचे नाव पुढे केले आहे, तर गडकरी यांनी त्यांना विरोध केला असून आमदार गिरीश बापट यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारच्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित होऊ शकलेले नाही. लातूरमधून टी.पी. कांबळे यांच्यासाठी मुंडे प्रयत्नशील असून गडकरी यांचा आमदार सुधाकर भालेराव यांच्यासाठी आग्रह आहे. रावेर मतदारसंघातून हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे व अन्य काही कारणांमुळे जावळेंना बदलण्याची मागणी आहे.
ठाणे लोकसभेसाठी धर्मराज्य पक्षातून नितीन देशपांडे
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन राजे यांचा धर्मराज्य पक्ष निवडणूक लढविणार असून त्यासाठी ठाण्यातील दक्ष नागरिक नितीन देशपांडे यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पर्यावरणवादी म्हणून देशपांडे यांची शहरात ओळख आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संजीव नाईक, शिवसेनेचे राजन विचारे, मनसेचे अभिजीत पानसे आणि आपचे संजीव साने निवडणूक लढविणार आहे.