काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांनी आपला मुलगा रोहित शेखर याला आपला राजकीय वारस म्हणून घोषित करून त्याला लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी सोनिया गांधींना साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर काही दिवसांपूर्वीच तिवारी यांनी रोहित हा आपलाच मुलगा असल्याचे कबूल केले होते.
एन. डी. तिवारी हे आपले वडील असल्याचा दावा रोहित शेखर याने केला होता. मात्र तिवारी यांनी हा दावा फेटाळला होता. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. गेली सहा वर्षे न्यायालयीन लढाई लढल्यानंतर ३ मार्च रोजी रोहित शेखर हा आपला मुलगा असल्याचे तिवारी यांनी कबूल केले. तसेच पत्रकार परिषदेत रोहित हा आपलाच मुलगा असून तो आपला राजकीय वारसदार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार तिवारी यांनी मुलाला राजकारणात सक्रिय करण्याचा निर्णय घेतला असून त्याला नैनिताल येथून उमेदवारी मिळावी यासाठी सोनिया गांधींना विनंती करणार आहेत.