शंकरराव चव्हाण यांनी प्रदीर्घ राजकीय जीवनात स्वच्छ प्रतिमा कसोशीने जपली. सत्तेतून संपत्ती-मालमत्तेच्या भानगडीत ते पडले नाहीत, असेही त्यांच्याबद्दल सांगितले जात असे, याचा उल्लेख करून पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी अशोकसारखा मुलगा असताना शंकररावांना संपत्ती-मालमत्ता जमा करण्याची काय गरज, असा सवाल सुमारे २० वर्षांपूर्वी एका लेखात केला होता. आज शंकरराव हयात नाहीत, ढसाळही नाहीत; परंतु ढसाळांचे निदान किती अचूक होते ते निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या मालमत्तेवरून (सुमारे ४० कोटी!) समोर आले आहे.
शंकरराव पहिली निवडणूक १९५२ मध्ये लढले, तर अशोक चव्हाण ३५ वर्षांनी म्हणजे १९८७ मध्ये. त्यानंतर राजकारणात स्थिर होण्यासाठी अनेकांप्रमाणे अशोक चव्हाण यांनीही व्यावसायिक जाळे भक्कम केल्याचे त्यांनीच जाहीर केलेल्या तपशिलातून दिसते. १०० रुपयांच्या ‘बाँड पेपर’सोबत संपत्ती व मालमत्तेचा तपशील जाहीर करण्यासाठी त्यांना तब्बल ३५ पाने लागली आहेत. चव्हाण यांनी आपली स्वत:ची, पत्नी अमिता यांची आणि हिंदू अविभक्त कुटुंबाची एकंदर मालमत्ता व संपत्तीही जाहीर केली. त्यानुसार चव्हाण कुटुंबाची एकत्रित मालमत्ता ३८ कोटी ८४ लाख ५८ हजार ९३९ रुपये इतकी आहे.
अशोक चव्हाण यांनी व्यवसाय म्हणून शेतीसोबत भारत पेट्रोलियमच्या डिलरशिपचा उल्लेख शपथपत्रात केला आहे. २००९ ची विधानसभा निवडणूक लढताना अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. त्या वेळी चव्हाण कुटुंबांची मालमत्ता २४ कोटी ६१ लाख होती. पाच वर्षांत त्यात १५ कोटींची वाढ झाली. सन २०१२-१३ या आर्थिक वर्षांत आयकर विभागाकडे दाखल केलेल्या विवरणानुसार चव्हाण यांचे वार्षिक उत्पन्न ३२ लाख ४२ हजार, तर अमिता यांचे १४ लाख ६३ हजार होते. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून चव्हाण कुटुंबाचे याच काळातील उत्पन्न २८ कोटी ४५ लाख होते.
चव्हाण, त्यांच्या कुटुंबाची धनेगावपासून औरंगाबाद, पैठण, मुंबई व नवी दिल्लीपर्यंत मालमत्ता आहे. शेतजमिनीसोबत बिगर शेतजमीन, घरे व इतर इमारतींचा त्यांच्या मालमत्तेत समावेश आहे. अर्ज भरताना चव्हाण यांच्या हातावरील रोख ५६ हजार ५७३, तर सौ. चव्हाण यांच्याकडे फक्त २ हजार १३६ रुपये होते. चव्हाण यांच्या नावावर काही मालवाहू वाहने आहेत; पण गाडी किंवा जीप नाही. सोने, दागिने व हिरे असे मिळून त्यांच्याकडे सुमारे ४२.५० लाख, तर सौ. चव्हाण यांच्याकडे ६४ लाख ५५ हजारांचा ऐवज आहे. त्यांच्या चल संपत्तीचे मूल्य १३ कोटी २७ लाख ४८ हजार रुपये दाखविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namdeo dhasals poem and ashok chavans asset