राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री नारायण राणे यांच्याशी केसरकर समर्थकांची सरळ लढत होणार आहे.
गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार केसरकर यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आघाडीचा धर्म पाळण्याची सूचना धुडकावून राणे यांचे चिरंजीव नीलेश यांच्या विरोधात उघड प्रचार केला. तेव्हापासून त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत निरनिराळे आडाखे बांधले जात होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच शिवसेनेने त्यांच्या स्वागताची भूमिका घेतली होती. केसरकर यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त करत राणेंच्या दहशतवादी प्रवृत्तीविरुद्ध आपला लढा असल्याची भूमिका घेत पत्ते उघड केले नव्हते. अखेर गेल्या चार दिवसांत वेगाने हालचाली होत राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याचे काल मुंबईत त्यांनी उघडपणे जाहीर केले.
उद्योगमंत्री राणे २००५ मध्ये काँग्रेसवासी झाल्यानंतर या जिल्ह्य़ात शिवसेनेची ताकद मोठय़ा प्रमाणात घटली. असंख्य कार्यकत्रे लोकसभा निवडणुकीत राणेंच्या विरोधात गेल्यामुळे जिल्ह्य़ातील कणकवलीसह तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये नीलेश यांना पिछाडीवर जावे लागले. केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघाने तर सुमारे ४१ हजार मतांची सर्वाधिक आघाडी दिली.
पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक गेली काही वष्रे राणेंच्या विरोधात एकाकी झुंज देत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी कणकवलीतून भाजपाचे प्रमोद जठार आणि सावंतवाडीतून केसरकर प्रतिनिधित्व करत आहेत. स्वत: राणे कुडाळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत तेथे त्यांची कोंडी करण्याची विरोधकांची व्यूहरचना राहणार आहे.
या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात मात्र अस्वस्थतेचे वातावरण आहे. राणे यांचे दुसरे चिरंजीव नितेश यांच्या वक्तव्यामुळे गेल्या आठवडय़ात जिल्ह्य़ातील आमदार राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते इत्यादींसह प्रमुख पक्षकार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर स्वत: राणे यांनी पुढाकार घेऊन पक्षांतर्गत वाद मिटल्याचे जाहीर केले.
दरम्यान, बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी आज ओरोस येथे पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली. आमदार केसरकरांच्या पक्षत्यागानंतरही जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा नव्या ताकदीने उभी राहील, असा विश्वास संपर्कमंत्री सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Story img Loader