भाजप आणि केंद्र सरकार यांच्यात योग्य समन्वय रहावा आणि भाजप कार्यकर्त्यांचे प्रश्न त्वरीत सोडवले जावेत, यासाठी भाजप अध्यक्ष यांनी शनिवारी नवीन योजना जाहीर केली. त्यानुसार, केंद्रातील भाजप मंत्र्यांना आळीपाळीने दररोज दोन तास पक्षाच्या मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याठिकाणी कार्यकर्त्यांना आपल्या तक्रारी वा मागण्या त्यांच्यासमोर मांडता येतील. त्या मंत्रालयाशी संबधित काम नसले तरी त्याच मंत्र्याकडे आपला प्रस्ताव वा विनंती अर्ज देण्याची सूचना शहा यांनी कार्यकर्त्यांना केली. उपस्थित मंत्री संबधित मंत्र्यांना कार्यकर्त्यांचा अर्ज पाठवेल, असे शहा यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक लोकांना भाजपशी जोडण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करतानाच येत्या नोव्हेंबरपासून सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
आपल्याला मिळालेले अध्यक्षपद एका सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान असल्याचे शहा यांनी नमूद केले. भारतीय जनता पक्षामध्येच केवळ ही परंपरा आहे. इतर पक्षांमध्ये केवळ घराणेशाही व मर्जीतल्या व्यक्तीलाच अध्यक्ष बनवले जाते, असा टोला शहा यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना लगावला.
माजी अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत नक्कीच जगत् गुरू होईल. आणि लोकांच्या अपेक्षांचीही पूर्तता होऊ शकेल.
वारस ‘अभाविप’
अमित शहा यांच्या संघटनेविषयी असलेल्या समर्पण भावनेचा एक किस्सा राजनाथ सिंह यांनी सांगितला. अमित शहा यांनी स्वतची विमा पॉलीसी काढली होती. कुणीही व्यक्ती विमा पॉलीसी काढताना वारस नामांकन म्हणून नातेवाईक वा निकटतम व्यक्तीचे नाव लिहीतो. पण अमित शहा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नाव लिहिले होते. हा प्रसंग राजनाथ सिंह यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
ठळक वैशिष्टय़े
*परराष्ट्र धोरणात शेजारील राष्ट्रांशी हितसंबंधांना प्राधान्य द्यावे
*महागाईवर नियंत्रण आणि काळ्या धनाचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य
*प्रशासकीय कारभारात पारदर्शकता