काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका करून कुंवर नटवरसिंह यांनी कटुता निर्माण केली आहे. पक्षातील एकेकाळचे चांगले सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून ख्याती असलेल्या मुरब्बी राजकीय नेत्याकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. काँग्रेसमध्ये आपण एक महत्त्वाचे नेते होतो, हे ते आता विसरले आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी केली.
ते म्हणाले, की सोनिया यांच्याविरोधात नटवरसिंह यांनी जो पवित्रा घेतला आहे, ते पाहून आपण दु:खी झालो आहोत. पक्षात अत्यंत विश्वासू म्हणून स्थान दिलेल्या व्यक्तीने पक्षाच्या चांगल्या काळात पदाची फळे चाखावीत आणि पडत्या काळात त्याच पक्षावर टीका करावी, हे योग्य नाही.
‘वन लाइफ इज नॉट इनफ’ या पुस्तकात सिंह यांनी सोनिया यांनी २००४ मध्ये पंतप्रधानपद न स्वीकारण्यावरून त्यांच्यावर टीका केली.
गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून पक्षात महत्त्वाचे स्थान असलेल्या सिंह यांनी २००५ मध्ये यूपीए सरकारमधून राजीनामा दिला. इराक सरकारने चालवलेल्या अन्नासाठी तेल या योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचाही त्याग केला.
सिंह यांच्या कामगिरीचा बराच फायदा काँग्रेसला झाला आहे. गतकाळात त्यांनी पक्षाचे सल्लागार म्हणून योग्य मार्गदर्शन केले. त्यांनाच त्याचा विसर पडावा, हे अनाकलनीय आहे. अशा व्यक्तीकडून ही अपेक्षा आपण करू शकत नाही, असे खुर्शीद पीटीआयशी बोलताना म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा