ओदिशात राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सत्तारूढ बीजेडीने माजी मंत्री ए. यू. सिंहदेव आणि भूपिंदरसिंग यांची उमेदवारी जाहीर केली आहे.ओदिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. येत्या ३ जुलै रोजी ही पोटनिवडणूक होणार आहे.पक्षाचे नेते शशिभूषण बेहेरा आणि रविनारायण मोहपात्रा हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने ही पोटनिवडणूक होणार आहे. सिंहदेव हे नवीन पटनाईक यांचे विश्वासू सहकारी आहेत. ओदिशा विधानसभेत बीजेडीचे ११७ आमदार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
पीपीएने आघाडीचा धर्म पाळला नाही – भाजपची टीका
इटानगर:राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपने मान्य केला असला तरी पक्षाने त्याचे खापर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेशवर (पीपीए) फोडले आहे. संसदीय लोकशाहीत पीपीएने आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला नाही, असे भाजपने म्हटले आहे.
पीपीए या प्रादेशिक पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएशी आघाडी केली होती. राज्यसभेच्या निवडणुकीत ते आघाडीचा धर्म पाळतील, अशी अपेक्षा होती.एनडीएशी आघाडी करूनही पीपीए या प्रादेशिक पक्षाने धर्म पाळला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे भाजपचे प्रवक्ते तेची नेचा यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे उमेदवार मुकुट मिठी यांनी भाजपचे उमेदवार तापेन सिगा यांचा ३७ मतांनी पराभव केला.
लघु, मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण -कलराज मिश्र
लखनऊ:अतिलहान, लहान आणि मध्यम उद्योगांची स्थिती सुधारण्यासाठी आणि या उद्योगांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रचलित पद्धतीमध्ये सुलभता आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी लवकरच एक नवे धोरण आखण्यात येणार आहे, असे लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी येथे सांगितले. या संदर्भात योग्य प्रकारे, परिणामकारक आणि प्राधान्याने काम झाल्यास किमान मिळकत असलेल्या व्यक्तीला रोजगार मिळाल्याचे पाहावयास मिळेल, त्याला स्वयंपूर्ण वाटेल. लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा आपल्या मंत्रालयाचा प्रयत्न आहे, असेही मिश्र म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा