नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या हिना यांना उमेदवारी देण्याची योजना असली तरी, नाहक पक्षावर टीका होण्याची शक्यता लक्षात घेता हा मार्ग पत्करू नका, असा सल्ला राष्ट्रवादीच्या वतीने गावित यांना देण्यात आला.
भाजप उमेदवारांच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीत हिना गावित यांचे नाव सुरुवातीला होते. पण नंदुरबारच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचे पक्षाच्या वतीने टाळण्यात आले. नंदुरबारमध्ये काँग्रेसचे माणिकराव गावित आणि राष्ट्रवादीचे डॉ. विजयकुमार गावित यांच्यातून विस्तवही जात नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असतात. डॉ. गावित यांच्या विरुद्ध न्यायालयीन खटले दाखल करण्यात काँग्रेसचीच स्थानिक नेतेमंडळी पुढाकार घेतात, असा राष्ट्रवादीचे आक्षेप आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. गावित यांच्या भावाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवून काँग्रेसच्या या हक्काच्या जागेवर माणिकराव गावित यांचा घाम काढला होता. आठ वेळा सहजपणे निवडून आलेल्या माणिकराव यांना नवव्यांदा निवडून येण्यासाठी जोर लावावा लागला होता. यंदा डॉ. गावित यांनी माणिकराव गावित यांना शह देण्याकरिता आपल्या मुलीलाच रिंगणात उतरविण्याची योजना आखली आहे.
मंत्र्यांचीच मुलगी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात लढल्यास चुकीचा संदेश जाईल, असा राष्ट्रवादीत मतप्रवाह आहे. मुलीला भाजपच्या वतीने लढवू नका, त्यातून पक्षावर टीका होईल, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी डॉ. गावित यांना दिल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा