प्रादेशिक पक्षांना लोकसभेची निवडणूक लढविण्यास मनाई करावी या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रस्तावाला भाजपबरोबरच मित्र पक्ष राष्ट्रवादीने विरोध दर्शविला आहे. घटनेत अशी तरतूदच नाही, असा मुद्दा भाजपने उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना मनाई करण्यात यावी म्हणजे दोन किंवा तीनच पक्ष रिंगणात राहतील, असे मत मुख्यमंत्री चव्हाण यांनी मांडले होते. त्यासाठी त्यांनी जर्मनीचे उदाहरण दिले. मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावावरून प्रादेशिक पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असतानाच मित्र पक्ष राष्ट्रवादीने याला विरोध केला आहे. घटनेत कोणत्याही राजकीय पक्षाला कोणतीही निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव मान्य करता येणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. तसा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी विरोध करेल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा हा प्रस्ताव चुकीचा असून, भाजपला त्याला विरोध असल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रादेशिक पक्षांवर र्निबध आणण्याबाबतची आपली भूमिका ही देशात स्थिर सरकारच्या अनुषंगाने असून या मुद्यावर सर्वपक्षीय चर्चा होण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. जर्मनीत अशाप्रकारे प्रादेशिक पक्षांवर र्निबध असून आपल्याकडेही अशाप्रकारची चर्चा होण्याची गरज असल्यामुळेच आपण हा मुद्दा पुढे आणल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp bjp hits out cm prithviraj chavan on statement on regional parties