‘अच्छे दिन आनेवाले है’ या आश्वासनावर मुंबई, ठाण्यातील मतदारांनी महायुतीला भरभरून मते दिली. याच महायुतीने सत्तेवर येऊन महिना होण्याच्या आधीच रेल्वे दरात भरमसाठ वाढ केल्याने महायुतीच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीला मुद्दा सापडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दरवाढीचा मुद्दा जास्तीत जास्त तापविण्यावर दोन्ही काँग्रेसने भर दिला असून, शनिवारपासूनच आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी मुंबई ते ठाणे हा विनातिकीट प्रवास करून सविनय भंगाचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. या आंदोलनाचे नेतृत्व स्वत: ठाकरे करणार आहेत. तसेच बुधवारी काँग्रेसच्या वतीने राज्यभर सर्व रेल्वे स्थानकांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणेकरांनी महायुतीला भरभरून मते दिली होती. त्याची परतफेड भाजप सरकारने दरवाढ करून दिली आहे. सर्वसामान्य जनता भाजप किंवा महायुतीला माफ करणार नाही, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडले जात असून, रेल्वे स्थानकांबाहेर जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जाहीर केले. मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली. एरवी रेल्वे दरवाढीच्या विरोधात प्रतिकिया व्यक्त करणारे राम नाईक आणि किरीट सोमय्या आता गेले कोठे, असा सवालही वाघ यांनी केला आहे. मुंबई, ठाण्यात विधानसभेच्या ६० जागा लक्षात घेऊनच काँग्रेस व राष्ट्रवादीने रेल्वे दरवाढीचा मुद्दा तापविण्यावर भर दिला आहे. दररोज सुमारे ७० लाख प्रवासी उपनगरी गाडीने प्रवास करतात. महायुतीला रोखण्यासाठीच काँग्रेस व राष्ट्रवादीने हा मुद्दा हाती घेतला आहे.
रेल्वे दरवाढीच्या विरोधात आघाडी आक्रमक
‘अच्छे दिन आनेवाले है’ या आश्वासनावर मुंबई, ठाण्यातील मतदारांनी महायुतीला भरभरून मते दिली. याच महायुतीने सत्तेवर येऊन महिना होण्याच्या आधीच रेल्वे दरात भरमसाठ वाढ केल्याने महायुतीच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीला मुद्दा सापडला आहे.
First published on: 22-06-2014 at 02:53 IST
TOPICSरेल्वे भाडे वाढ
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp congress alliance aggressive against rail fare hike