शिरुरमध्ये कोणी लढायला तयार नव्हते. शेजारील मावळमध्ये शिवसेनेतून आलेल्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्याची आली. एकूणच पुणे या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात एक उमेदवार आयात करावा लागला तर दुसऱ्याच्या गळ्यात उमेदवारी टाकावी लागली. मावळमध्ये चिंचवडचे अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्याची योजना होती. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत केली तरच आपण लढू, अशी अट त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना घातली होती. आचारसंहिता लागू होईपर्यंत मराठा आरक्षण आणि अनधिकृत बांधकामे नियमित करणे हे राष्ट्रवादीला अपेक्षित असलेले दोन्ही निर्णय तांत्रिक बाबींमुळे होऊ शकले नाहीत. जगताप शेकापच्या गोटात गेले आणि त्यांच्या वतीने अपक्ष लढणार आहेत. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ या दोन्ही निवडणुकांमध्ये अपक्ष लढलेल्या जगताप यांना राष्ट्रवादीने मदत केली होती. त्यातूनच ते निवडून आले होते. हा प्रयोग होणार नाही, असे अजित पवार यांनी सूचित केले असले तरी केवळ उरणमध्ये हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने ये-जा असलेल्या नार्वेकर यांना उमेदवारी का देण्यात आली या प्रश्नावर ते उच्चशिक्षीत असल्याने त्यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे पवार यांचे म्हणणे होते. मावळ मतदारसंघात चिंचवड, पिंपरी आणि मावळ हे तीन पुणे जिल्ह्यातील तर पनवेल, उरण आणि कर्जत हे रायगड जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचा समावेश होते. मुंबईत कुलाब्यात राहणाऱ्या नार्वेकर यांचा मावळ मतदारसंघाशी तसा राजकीय संबंध काहीही नाही. 

शिरुरमध्ये विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील किंवा जुन्नरचे वल्लभशेठ बेणके यांना उमेदवारी देण्याची पक्षाची योजना होती. पण दोन्ही नेत्यांनी स्पष्ट नकार दिल्याने या दोन नेत्यांच्या तुलनेत तसे कमकुवत मानल्या जाणाऱ्या देवदत्त निमक यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मावळमध्ये लढण्यासाठी पक्षाच्या तीन नेत्यांनी इच्छा व्यक्त केली होती. पण अपक्ष जगताप, शिवसेनेचे बेणगे हे दोन उमेदवार पुणे पट्टय़ातील असल्याने रायगड पट्टय़ातील नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याचा दावा अजित पवार यांनी केला.

.. अखेर राष्ट्रवादीने उमेदवार आयात केला!

नार्वेकरांची नाराजी राष्ट्रवादीच्या पथ्यावर
विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी आवश्यक असलेले मतांचे गणित जमत नसल्याने राहुल नार्वेकर नाराज झाले होते. त्यांची ही नाराजी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. नार्वेकर शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याचे ओळखूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नार्वेकर यांचे सासरे आणि माजी मंत्री रामराजे नाईक – निंबाळकर आणि किरण पावसकर यांच्या माध्यमातून राहुल नार्वेकरांना गळाला लावल्याची चर्चा आहे. नार्वेकर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांचे सासरे नाईक-निंबाळकर हे उपस्थित होते.

शिवसैनिकांची निदर्शने 
राहुल नार्वेकर यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करण्याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याची कुणकूण लागताच नार्वेकर यांच्या कुलाबा परिसरातील २५ शिवसैनिक राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेर धडकले आणि त्यांनी नार्वेकर यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि गाडीत कोंबले, पण पोलिसांना गुंगारा देत कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर आले. तेवढय़ात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचे आगमन झाले. तेव्हा पोलिसांनी पुन्हा हस्तक्षेप केला आणि शिवसैनिकांना ताब्यात घेतले. तेव्हा आव्हाड आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली.

स्वपक्षीयांकडूनच पराभवाचे प्रयत्न ;नार्वेकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल
विधान परिषद निवडणुकीतून अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज माघारी घेणारे शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना नेतृत्वावर टीकेची तोफ डागत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्या पराभवासाठी शिवसेनेतूनच पद्धतशीर प्रयत्न झाल्याचा आरोप करत नेतृत्वाने दिलेल्या आदेशानंतरच आपण माघार घेतल्याचा दावा नार्वेकरांनी यावेळी केला.
विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आदल्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत आपण शिवसेना भवनात होतो. तेव्हा खासदार अनिल देसाई यांच्याशी आपली चर्चाही झाली. घोडेबाजार रोखण्याकरिता माघार घ्यावी, असे आपल्याला सुचविण्यात आले. त्यानुसार माघार घेत्ल्याचे नार्वेकर म्हणाले. या निवडणुकीत शिवसेनेकडे दुसरा उमेदवार निवडून आणण्याकरिता पुरेशी मते नव्हती. बाहेरून मते मिळविण्याकरिता आपण प्रयत्न करीत होतो. पण हे सारे अपक्ष उमेदवाराप्रमाणे करीत होतो. कारण शिवसेनेकडून आपल्याला काहीच मदत मिळाली नाही. आपला पराभव होईल अशा पद्धतीनेच सारी व्यवस्था पक्षातून करण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेत आपली घुसमट होत होती. पक्षांतर्गत राजकारणातूनच आपला राजकीय बळी दिला जात होता असेही नार्वेकर म्हणाले.

राहुल नार्वेकरांना अतिरेकी महत्त्वाकांक्षा नडली!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई असलेले राहुल नार्वेकर हे प्रथमपासूनच महत्त्वाकांक्षी असून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी कुलाबा मतदारसंघातून अ‍ॅनी शेखर यांच्याकडून पराभूत झाल्यापासून आजपर्यंत कधी राज्यसभा तर कधी विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांनी सातत्याने आग्रह धरल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
राहुल नार्वेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देतानाही शिवसेनेने पहिल्या पसंतीची ३० मते ही निलम गोऱ्हे यांना देण्यात येतील असे स्पष्ट केल्यामुळे पक्षाची सोळा मते व अधिकची मते आणण्याची जबाबदारी नार्वेकर यांचीच असेल असे त्यांना स्पष्ट करण्यात आले होते. राहुल याच्या निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई व माजी आमदार अनिल परब यांच्यावर असतानाही राहुल यांनी कोणालाच विश्वासात न घेताच परस्पर भाजप व अन्य अपक्षांशी भेटीगाठी सुरू केल्या होत्या असे सेनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
यापूर्वीही राज्यसभेसाठी धूत यांची जागा मागितली होती एवढेच नव्हे तर संजय काकडे यांच्याविरोधात लढण्याची विनंती त्याने पक्षाकडे केली होती. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून सातत्याने राज्यसभेसाठी मागणी चालविली होती. अनिल देसाई यांच्यापासून ते संजय काकडे यांच्यापर्यंत प्रत्येकवेळी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असलेल्या नार्वेकर यांनी आता विधान परिषदेची जागा अट्टाहासाने मागितली व युवराजांच्या आग्रहाखातर राहुल हट्ट पुरविण्यात आला. मात्र उद्धव ठाकरे यांनी मते फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन पहिल्या पसंतीच्या तीस मतांचा कोटा निलम गोऱ्हे यांना दिला जाईल व उर्वरित जादा मतांची जुळवाजुळव तुला करावी लागेल असे स्पष्टपणे सांगितले होते. भाजप प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह काहींची भेट घेतल्यानंतर अतिरिक्त मते मिळणार नाहीत हे लक्षात येताच राहुल नार्वेकर यांनी माघार घेतली खरी परंतु त्यांची अतिरेकी महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांना जाळात अलगदपणे अडकवल्याचे सेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.