लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची खेळी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांच्या अंगलट आली. रावेर मतदारसंघात दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने खासदारकी तर मिळाली नाहीच, पण आमदारकीही गेली, अशी अवस्था जैन यांची झाली.
राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य ईश्वर जैन यांचे पुत्र मनीष हे विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. अपक्ष आमदाराने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केल्यास त्याच्या आमदारकीवर गदा येऊ शकते. रावेर मतदारसंघातून विजयाची खात्री असल्यानेच मनीष जैन यांनी पुढे कायदेशीर धोका नको म्हणून आमदारकीचा राजीनामा सादर केला.
मनीष जैन यांची विधान परिषदेची जळगाव मतदारसंघातील निवडणूक राज्यभर गाजली होती. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या पुत्राचा त्यांनी ‘अर्थपूर्ण’ झालेल्या निवडणुकीत पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्याकरिताच खडसे यांनी रावेर मतदारसंघात आधी जाहीर झालेला उमेदवार बदलून आपल्या सुनेला उमेदवारी देण्यास भाग पाडले होते. मुलाच्या निधनानंतर खचलेल्या खडसे यांनी सुनेला निवडून आणण्याकरिता सारी प्रतिष्ठा पणाला लावली आणि विजय प्राप्त केला. राजकीय पुनर्वसनासाठी मनीष जैन यांना विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक पुन्हा लढवावी लागेल. या निवडणुकीत विजयासाठी पुन्हा नगरसेवक मंडळींना चुचकारावे लागेल. अन्यथा विधानसभेचा मार्ग पत्करावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा